Friday, January 31, 2025

पांगरी,ता.सिल्लोड येथे कापुस शेती दिन कार्यक्रम संपन्न

पांगरी ता सिल्लोड येथे कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने कापुस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम संपन्न

विशेष कापूस प्रकल्प २०२४-२५

केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत दि. ३१-०१-२०२५ मौजे पांगरी, ता. सिल्लोड येथे प्रगतशील शेतकरी श्री. विठ्ठल सांडु खरात यांच्या शेतावर प्रक्षेत्र दिवसांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. बी. एल. पिसुरे, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) यांनी प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांना समजावून सांगितला. कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये योग्य अंतर आणि संतुलित व गरज लागेल तेंव्हाच खतांचा वापर करणे या बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. तसेच सर्व शेतकऱ्यांनी बेडचा व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे आणि एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापनाचां अवलंब करावा, असे डॉ. पिसुरे यांनी सांगितले. 

सेंद्रिय शेतीचे अभ्यासक श्री.माऊली कापसे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना देशी बियाण्यांचे महत्त्व, माती परिक्षणाचे महत्त्व, सेंद्रिय घटकांचा योग्य वापर इत्यादींवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या सर्व बाबींचा अवलंब करून शेतकरी बांधवांनी विषमुक्त शेती कडे वळावे,असेही सांगितले. दादा लाड तंत्रज्ञानामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्पादनात वाढ होत आहे, त्यामुळे या तंत्राचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा. असे त्यांनी प्रतिपादन केले.

पांगरी येथील विशेष कापूस प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकरी श्री. श्री.विष्णु पंडीत, श्री.बापु देशमुख, श्री.दिनेश राजपुत, श्री.कौतिक मिरगे, श्री.अमोल वाघ, डॉ.जाधव व श्री.विठ्ठल राठोड यांची उपस्थिती होती. विशेष कापूस प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षक श्र. सतिश कदम, श्री.जयदेव सिंगल यांनी कार्यक्रमचे नियोजन केले. कार्यक्रमाला विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते










Thursday, January 30, 2025

शेकटा येथे कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने कापुस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम संपन्न


शेकटा येथे कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने कापुस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम संपन्न

विशेष कापूस प्रकल्प-२०२४-२५

            भा.कृ.अनु.प-केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या  विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत दि. ३०-०१-२०२५ रोजी पैठण तालुक्यातील मौजे शेकटा येथे प्रगतशील शेतकरी श्री राजेंद्र भवर यांच्या शेतावर कापूस प्रक्षेत्र दिन कार्यक्रम घेण्यात आला. 
               यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ च्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी शेतीतुन शाश्वत उत्पादन घेण्यासाठी मातीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक शेतकरी बांधवांनी माती परिक्षण करावे व त्यानुसार पिक लागवडीचे नियोजन करावे. तसेच शाश्वत शेतीसाठी एकात्मिक पिक पद्धतीचा वापर करावा. शेतकरी बांधवांनी सुधारीत कापुस लागवडीचा अवलंब करून जास्तीत जास्त कापसाचे उत्पन्न वाढवावे. तसेच शेतकऱ्यांनी तांत्रिक अडचणी साठी कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथे संपर्क साधावा, असे प्रतिपादन केले. 
              कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. बी. एल. पिसुरे, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) यांनी प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांना समजावून  सांगितला. दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये योग्य योग्य अंतर आणि संतुलित व गरज लागेल तेंव्हाच खतांचा वापर करणे या बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. यामध्ये त्यांनी ३० दिवसांनी गळ फांदी काढणे व ८०-९०  दिवसांनी शेंडा खुडणे ही महत्त्वाची कामे आहेत. तसेच कापसाची लागवड ही ९० × ३० सेंटिमीटर या अंतरावर करावी. या पद्धतीने झाडांची एकरी संख्या वाढून उत्पन्न वाढते. तसेच सर्व शेतकऱ्यांनी बेडचा व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे आणि अन्नद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. ज्यामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काचा नियमितपणे वापर करणे, जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा असे सांगितले. कपाशी वेचणीनंतर अनेक शेतकरी फरदड घेतात, ते घेऊ नका त्याऐवजी पऱ्हाटीची कुट्टी करा त्यातुन चांगले सेंद्रीय खतचं मिळते परिणामी जमिनीचा पोत सुधारतो असे डॉ. पिसुरे यांनी सांगितले. 
             यावेळी शेकटा येथील विशेष कापूस प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकरी श्री. राजेंद्र भवर, श्री. आबासाहेब भवर  यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेतले. तसेच या सुधारित लागवड तंत्रज्ञानामुळे त्यांचा या वर्षी ४-५ क्विंटल उत्पादनात वाढ झाली. याबद्दलचे आपले अनुभव शेतकऱ्यांना सांगितले आणि या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. विशेष कापूस प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षक श्री सतिश कदम, श्री जयदेव सिंगल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Saturday, January 25, 2025

मा.डॉ.धर्मेद्र सारस्वत, प्राध्यापक, परड्यु विद्यापीठ, इंडियाना स्टेट, अमेरिका यांची केव्हीके,छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

मा.डॉ.धर्मेद्र सारस्वत, प्राध्यापक, परड्यु विद्यापीठ, इंडियाना स्टेट, अमेरिका यांची केव्हीके,छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट


दिनांक २४ जानेवारी, २०२५ रोजी मा.डॉ.धर्मेंद्र सारस्वत, प्राध्यापक, कृषी आणि जैविक अभियांत्रिकी विभाग, परड्यु विद्यापीठ, इंडियाना स्टेट, अमेरिका यांनी केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर ला भेट दिली. यावेळी त्यांनी केव्हीकेच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली.

केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेले विविध विस्तार कार्यक्रम, सुविधा तसेच निविष्ठा निर्मिती व विक्री इत्यादी सुविधा या खूपच उपयुक्त असून शेतकरी बांधवांना याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे कृषी तंत्रज्ञान प्रसारात केव्हीके अविभाज्य आणि महत्वपूर्ण कार्य करत आहे, असे मत मा.डॉ.धर्मेंद्र सारस्वत यांनी यावेळी व्यक्त केले.
  
डॉ.सारस्वत यांचे कृषी आणि जैविक अभियांत्रिकी विभागात महत्वपूर्ण योगदान असून त्यांना त्यांच्या कार्यासाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

यावेळी केव्हीके च्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी केव्हीकेच्या वतीने मा.डॉ.सारस्वत यांचे स्वागत केले. यावेळी विषय विशेषज्ञ इंजि.गीता यादव, डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, श्री.अशोक निर्वळ, श्रीमती.पौर्णिमा माने, श्री.विवेक पतंगे, श्री.किशोर शेरे, श्री.लक्ष्मण शिंदे, श्रीमती.सविता मानकर, श्री सतीश कदम, श्री.जयदेव सिंगल, श्री.जयदीप बनसोडे यांच्यासमवेत कार्यालयातील सर्वच अधिकारी कर्मचारी उपस्थिती होते.












गणोरी येथे महिला शेतकरी मेळावा संपन्न

शाश्वत कापूस उत्पादनासाठी एकात्मिक आणि सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा - डॉ.बस्वराज पिसुरे


सेवा,एनजीओ, छत्रपती संभाजीनगर आणि कॉटन कनेक्ट, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जानेवारी, २०२५ रोजी गणोरी, ता.फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर येथे महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाश्वत कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.बस्वराज पिसुरे, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण), केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कापूस सुधारित लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन, अति घन आणि घन लागवड तंत्रज्ञान, दादा लाड लागवड तंत्रज्ञान आणि फरदड व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून गणोरी गावच्या सरपंच श्रीमती.सरलाताई तांदळे यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी महाबीज च्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती.स्वाती मगर, कॉटन कनेक्टच्या श्रीमती.मनीषा टेकाळे, स्त्रीरोग तज्ञ डॉ.दुर्गा तांदळे, सेवा संस्थेचे राज्य समन्वयक श्री.मुंजा रेंगे, कृषी पर्यवेक्षक श्री.दोंडे सर, कृषी सहायक श्री.अजमेरा सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी महिला शेतकरी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.






Monday, January 13, 2025

कापूस शेतीदिन कार्यक्रम संपन्न

दियानतपुर, ता.पैठण येथे कापूस शेतीदिन कार्यक्रम संपन्न 

दिनांक १३ जानेवारी, २०२५ रोजी दियानतपूर, ता.पैठण येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत आत्मा, छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे कापूस शेतीदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून डॉ.बस्वराज पिसुरे, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण), केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१, कृषीरत्न मा.श्री.कातबने अप्पा, मंडळ कृषि अधिकारी मा.श्री.सरोदे साहेब, कृषी विभागाचे अधिकारी मा.श्री.निकम साहेब, मा.श्री.वाघचौरे साहेब, मा.श्री.घोलवाल साहेब, मा.श्री.यशवंत चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी फरदड निर्मूलन, कापूस लागवड तंत्रज्ञान, घन व अति घन लागवड पद्धती तसेच कांदा पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, नैसर्गिक शेती इत्यादी विषयांवर विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोसंबी, केळी, कांदा इत्यादी ठिकाणी प्रक्षेत्र भेटी देऊन चर्चा करण्यात आली.



Sunday, January 12, 2025

मा.श्री.रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉल ला भेट

मा.श्री.रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त, महाराष्ट्र तथा महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉल ला भेट

विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू-भगिनीं, विद्यार्थ्यांची केव्हीकेच्या स्टॉल मोठ्या संख्येने भेट दिली

ॲग्रोवन कृषी प्रदर्शन-२०२५

दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन सुरू झाले. या प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे स्टॉल लावण्यात आलेला आहे. या स्टॉलला आज दिनांक १२ जानेवारी, २०२५ रोजी मा.श्री.रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त, महाराष्ट्र तथा महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी केव्हीकेच्या विविध उपक्रमाबाबत माहिती जाणून घेतली व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.  

यावेळी सोबत मा.श्रीमती.धनश्री जाधव, प्रकल्प संचालक, आत्मा, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.लक्ष्मण काळे,  कृषि अधिकारी, मा.श्री.शकील पटेल, मंडळ कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांची उपस्थिती होती.

तसेच आज मा.डॉ.मोहन पाटील, माजी प्रमुख, फळ संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगर आणि मा.श्री.ज्ञानेश्वर बरदे, तालुका कृषि अधिकारी, सिल्लोड, मा.श्री.विकास पाटील, तालुका कृषि अधिकारी, पैठण, ॲडव्हकेट मा.श्री.आकाश गाढे, छत्रपती संभाजीनगर यांनीही स्टॉलला भेट दिली.

केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या वतीने डॉ.बस्वराज पिसुरे, श्री.जयदेव सिंगल, श्री. जयदीप बनसोडे आदींनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.











Saturday, January 11, 2025

मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉल ला भेट

मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉल ला भेट

विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू-भगिनीं, विद्यार्थ्यांची केव्हीकेच्या स्टॉल मोठ्या संख्येने भेट

ॲग्रोवन कृषी प्रदर्शन-२०२५

दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन सुरू झाले. या प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे स्टॉल लावण्यात आलेला आहे. या स्टॉलला मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी दि.११ जानेवारी, २०२५ रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी केव्हीकेचे विविध उपक्रमाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ द्वारे मार्गदर्शित मातोश्री बबाई प्रोड्युसर कंपनी, वाकोद, ता.कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या ड्रोनची पाहणी करून त्याबद्दलची माहिती जाणून घेतली व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.  

यावेळी सोबत मा.डॉ.गिरीधारी वाघमारे, संचालक, विस्तार शिक्षण,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी, मा.डॉ.सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प,छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.किरण जाधव, प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, बदनापूर, मा.डॉ.संजय पाटील सोयगावकर, प्रभारी अधिकारी, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर यांच्यासोबत इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या वतीने डॉ.अनिता जिंतूरकर, इंजि. गीता यादव, डॉ.संजूला भावर, श्री.अशोक निर्वळ, श्री.जयदेव सिंगल, श्री. जयदीप बनसोडे आदींनी मा.कुलगुरू व सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉलवर विविध कृषी तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली जात आहे. ज्यामध्ये जैविक खते, जैविक बुरशीनाशके, कुक्कुटपालन, शेळीपालन, कृषी विज्ञान केंद्राचे विविध उपक्रम, फळबाग लागवड, फुलशेती, कृषी हवामान सल्ला पत्रिका, किसान सारथी, कृषी अभियांत्रिकी, ड्रोनचा शेतीसाठी वापर व इतर विविध विषयावर सविस्तर माहिती दिली जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू भगिनी आणि विद्यार्थी केवहिकेच्या स्टॉलला मोठ्या संख्येने भेटी देऊन माहिती घेत आहेत. हे प्रदर्शन १३ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू असून कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलला जास्तीत जास्त शेतकरी बंधू भगिनीं, विद्यार्थ्यांनी भेट द्यावी.



Friday, January 10, 2025

मा.डॉ.गिरीधारी वाघमारे, मा.डॉ.तुकाराम मोटे, मा.डॉ.सूर्यकांत पवार आदी मान्यवरांची केव्हीके च्या स्टॉल ला भेट

मा.डॉ.गिरीधारी वाघमारे, मा.डॉ.तुकाराम मोटे, मा.डॉ.सूर्यकांत पवार आदी मान्यवरांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर च्या स्टॉल ला भेट

शेतकरी बंधू-भगिनीं, विद्यार्थ्यांची केव्हीकेच्या स्टॉल मोठ्या संख्येने भेट

ॲग्रोवन कृषी प्रदर्शन-२०२५

दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन सुरू झाले. या प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे स्टॉल लावण्यात आलेला असून या स्टॉलवर विविध कृषी तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली जात आहे. ज्यामध्ये जैविक खते, जैविक बुरशीनाशके, कुक्कुटपालन, शेळीपालन, कृषी विज्ञान केंद्राचे विविध उपक्रम, फळबाग लागवड, फुलशेती, कृषी हवामान सल्ला पत्रिका, किसान सारथी, कृषी अभियांत्रिकी, ड्रोनचा शेतीसाठी वापर व इतर विविध विषयावर सविस्तर माहिती दिली जात आहे. 

या स्टॉलला दि.१० जानेवारी,२०२५ रोजी मा.डॉ.गिरीधारी वाघमारे, संचालक, विस्तार शिक्षण,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी, मा.डॉ.तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प,छत्रपती संभाजीनगर तसेच ॲग्रोवनचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मा.श्री. संतोष मुंडे, प्रगतशील शेतकरी मा.श्री. दीपक जोशी, महाराष्ट्र शासनाचा रेशीमरत्न पुरस्कार विजेते शेतकरी मा.श्री. सदाशिव गीते तसेच इतर मान्यवर आणि प्रगतशील शेतकरी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट देऊन सर्व उपक्रमांची माहिती घेतली. हे प्रदर्शन १३ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू असून कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलला जास्तीत जास्त शेतकरी बंधू भगिनीं, विद्यार्थ्यांनी भेट द्यावी.



राष्ट्रीय सुरक्षेसाठी खाद्य सुरक्षा अत्यंत आवश्यक - मा.डॉ.इन्द्र मणि



 राष्ट्रीय सुरक्षेसाठी खाद्य सुरक्षा अत्यंत आवश्यक - मा.डॉ.इन्द्र मणि

विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत शेतकरी मेळावा संपन्न.

     भा.कृ.अनु.प. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, भा.कृ.अनु.प. अटारी, पुणे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने शेकटा, ता.पैठण येथे विशेष कापूस प्रकल्पांतर्गत दिनांक ०८ जानेवारी, २०२५ रोजी शेतकरी मेळावा कार्यक्रम घेण्यात आला. या किसान मेळाव्याचं अध्यक्षस्थानी मा. डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू वनामकृवी परभणी  होते.

शेतकरी बांधवांनी वाढीव उत्पादन घेत असताना  रासायनिक घटकांचा वापर कमीतकमी करून  उत्पादन खर्च  कमी करणे आवश्यक आहे तसेच एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करावा. कारण खाद्य सुरक्षा ही राष्ट्र सुरक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. तसेच पीक पद्धती मध्ये देखील बदल करण्याची गरज आहे. परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या तुरीच्या बिडीएन ७११ आणि गोदावरी या वाणांचा शेतकरी बांधवाना खूप मोठ्या प्रमाणावर अवलंब करून उत्पादनात वाढ करत आहे. तसेच प्रगतशील शेतकऱ्यांनी अवलंब केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार इतर शेतकरी बांधवा मध्ये करण्यास कार्य करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे मा.कुलगुरू डॉ.इन्द्र मणि यांनी या प्रसंगी केले.

    भा.कृ.अनु.प. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, भा.कृ.अनु.प. अटारी, पुणे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने शेकटा, ता.पैठण येथे विशेष कापूस प्रकल्पांतर्गत दिनांक ०८ जानेवारी, २०२५ रोजी शेतकरी मेळावा कार्यक्रम घेण्यात आला. याच्या अध्यक्षस्थानी डॉ.इन्द्र मणि उपस्थित होते.

     यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.गिरीधारी वाघमारे, संचालक, विस्तार शिक्षण वनामकृवि, परभणी, मा.डॉ.एस.बी.पवार सहयोगी संचालक संशोधन, एनएआरपी, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.ए.एस. तायडे, मुख्य शास्त्रज्ञ, डॉ.व्ही.एस. नगरारे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ.सुनील महाजन, वरिष्ठ शास्त्रज्ञ केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, शेकटा गावचे सरपंच श्री.विष्णू पाटील भवर यांची उपस्थिती होती. तसेच डॉ. दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१, प्रगतीशील शेतकरी श्री.रवींद्र भवर, श्री.आबासाहेब भवर, विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, श्री.अशोक निर्वळ, श्री.सतीश कदम, श्री.जयदेव सिंगल, श्री.जयदीप बनसोडे, श्री.शिवा काजळे व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.वाघमारे म्हणाले की, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यत पोचवण्यासाठी विद्यापीठ कटीबद्ध आहे. वातावरण बदलामुळे शेतीमध्ये विविध आव्हाने येत असून शेतकऱ्यांनी अभ्यासुपणाने शेती करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध संसाधनाचा वापर करुन अधिक उत्पादन घेण्यावर भर द्यावा. यासाठी विशेष कापूस प्रकल्पा सारख्या प्रकल्पांचा लाभ घेऊन सुधारीत लागवड पद्धतीचा अवलंब करावा. कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातुन विद्यापीठ सदैव तंत्रज्ञान प्रसारात कार्य करत आहे.

     यावेळी डॉ. नगरारे म्हणाले की, विशेष कापूस प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांचे महाराष्ट्रात उत्पादन वाढत आहे असे सांगितले तसेच कापूस पिकामध्ये दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान, सघन लागवड व अतिघन लावगड याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हातील या प्रकल्पांतर्गत कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहे. तसेच येत्या काळात कापूस पिकाचे उत्पादन कसे वाढविता येईल. यासाठी कार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले.

     यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.तायडे म्हणाले की, कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी उत्पादन खर्च देखील कमी करण्याची गरज आहे. आणि यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य, कीड रोग आणि लागवड पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. कापूस पिकामध्ये फवारणी व खतांवर अमाप खर्च करत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्याची गरज आहे आणि यासाठी एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये योग्य वाणाची निवड, बेडवर लागवड, योग्य अंतर आणि संतुलित व गरज लागेल तेंव्हाच खतांचा वापर करणे या बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. गळ फांदी काढणे व शेंडा खुडणे ही महत्त्वाची कामे आहेत. तसेच कापसाची लागवड ही ९० × ३० सेंटिमीटर या अंतरावर करावी. या पद्धतीने झाडांची एकरी संख्या वाढून उत्पन्न वाढते. तसेच सर्व शेतकऱ्यांनी बेडचा व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. आणि अन्नद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. ज्यामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काचा नियमितपणे वापर करणे, जैविक बुरशीनाशकांचा वापर करणे इत्यादी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

डॉ.दिप्ती पाटगावकर, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक  यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी  विशेष कापूस प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील २१० एकर क्षेत्रावर हा प्रकल्प राबवला जात असून एकूण ९५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत असलेल्या सुधारीत लागवड पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे कापूस उत्पादन वाढल्याचे आढळून आलेले आहे. कापुस पिकामध्ये कापूस लागवड च्या विविध लागवड तंत्रज्ञान चा अवलंब व त्याचा शेतकऱ्यांचा अनुभव यासाठी सदर प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबवण्यात येत असून बरेच शेतकरी या तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. याच्या तांत्रीक बाबींवर सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी केव्हीके द्वारे जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी प्रगतशील शेतकरी  श्री. रवींद्र भवर, श्री. आबासाहेब भवर, श्री. यज्ञेश कातबने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शेतकऱ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पिसुरे तर आभार प्रदर्शन डॉ. अनिता जिंतूरकर यांनी केले.






केव्हीके, छत्रपती संभाजीनगर येथे महिला शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

 


महिला शेतकऱ्यांनी काबाड कष्ट कमी करण्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे - डॉ.पंडित मुंडे

महिला शेतकरी मेळावा संपन्न

स्त्रीशक्तीच्या शिक्षणाचे दरवाजे उघडणाऱ्या आणि ज्यामुळे त्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या क्रांतीज्योती सावत्रीबाई फुले यांचे कार्य आणि त्यांचे जीवन आपणा सर्वासाठी दिशादर्शक आणि आदर्श असून त्यांच्या जीवनातून प्रोत्साहन घेऊन प्रत्येक महिलेने समाजाचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे. भारतातील शेती हि मुख्यत: महिला शेतकऱ्यांच्या अविरत कष्टावर अवलंबून आहे. महिला शेतकऱ्यांना शेतीमध्ये अनेक काबाड कष्ट करावे लागतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसतात. यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि अन्य विद्यापीठांनी महिला शेतकऱ्यांचे काबाड कष्ट कमी करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. त्या सर्व तंत्रज्ञानाची माहिती महिला शेतकऱ्यांनी घेऊन त्यांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे दिनांक ०३ जानेवारी, २०२५ रोजी आयोजित महिला शेतकरी मेळावा चे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कृषि तंत्र विद्यालय, छत्रपती संभाजीनगरचे प्राचार्य डॉ.पंडित मुंडे यांनी व्यक्त केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून श्रीमती. मधुरिमा जाधव, सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, छत्रपती संभाजीनगर, डॉ.गीता आचार्य, उद्योजिका तथा सामाजिक कार्यकर्त्या, छत्रपती संभाजीनगर यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी डॉ.अनिता जिंतूरकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर, विषय विशेषज्ञ इंजि.गीता यादव, डॉ.संजूला भावर, डॉ.बस्वराज पिसुरे,  कृषि उद्योजिका श्रीमती.कालिंदा जाधव, श्रीमती. छायाताई साबदे,श्रीमती.निलीमाताई,  सावित्रीबाई समाज एकात्म मंडळ च्या श्रीमती देशमुख व महिला शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ अनिता जिंतूरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती. जाधव म्हणाल्या कि, समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिलांनी नेतृत्व करणे गरजेचे आहे. स्वतःला कमी न समजता आणि केवळ ठराविक चौकटीत न राहता बाहेर येऊन निडरपणे सर्व क्षेत्रात पुढे येऊन कार्य करण्याची गरज आहे. मुलींनी उच्च शिक्षण घेऊन समृद्धी साधावी आणि महिलांनी देखील कृषि आणि ग्रामीण विकासाच्या प्रत्येक कार्यक्रमात अत्यंत उत्साहात सहभागी व्हावे. महिला शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायात देखील खूप मोठ्या प्रमाणावर संधी असून याकडे महिलांनी ओळावे आणि यासाठी शासनाचा मत्स्य व्यवसाय विभाग सदैव आपल्या पाठीशी असेल.


यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.आचार्य यांनी महिलांचे मानसिक, शारीरिक व आर्थिक सक्षमीकरण यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या कि महिला याच समाजाचा कणा आहेत. त्यामुळी हा कणा सदैव ताठ आणि कार्यरत असणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक महिला ही सक्षम, संपन्न आणि समृद्ध झाली पाहिजे आणि यासाठी सर्वांनी मिळून कार्य करण्याची गरज आहे. महिलांचे सबलीकरण करण्यासाठी महिला उद्योजिका घडणे आवश्यक आहे. यासाठी आसपासचे वातावरण, शिक्षण, अनुभव, प्रयोगशीलता आणि बाहेरच्या जगाशी संवाद या पंचसुत्रीची आवश्यकता आहे. या पाचही बाबींमध्ये महिला शेतकऱ्यांनी आपला विकास घडून आणला तर नक्की महिला सक्षम होण्यास मदत होणार आहे.

यावेळी केव्हीके, छत्रपती संभाजीनगर द्वारे प्रशिक्षित महिला उद्योजिका श्रीमती. श्रीमती.कालिंदा जाधव, श्रीमती. छायाताई साबदे, श्रीमती.निलीमाताई यांनी आपल्या व्यवसाय उभारणी व उद्योजिका होण्यापर्यंतचे अनुभव सर्व उपस्थितांना सांगितले. यावेळी केव्हीके मार्फत त्यांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केव्हीकेद्वारे राबण्यात येणारे उपक्रमाबद्दल माहिती सांगून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ.संजूला भावर यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.सतीश कदम,श्री.जयदेव सिंगल, श्री.जयदीप बनसोडे यांनी नियोजन केले.




मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...