Monday, March 24, 2025

महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक उन्नती आवश्यक - कुलगुरू मा.प्रा.(डॉ) इन्द्र मणि




महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक उन्नती आवश्यक - मा.प्रा.(डॉ) इन्द्र मणि

परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे दिनांक २४ मार्च २०२५ रोजी आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत परसबागेतील कुक्कुटपालन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याचे अध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू मा.प्रा.(डॉ) इन्द्र मणि यांची उपस्थिती होती. यावेळी मा.डॉ.राकेश अहिरे, संचालक विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, मा.डॉ.सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, एनएआरपी, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.संजय पाटील, प्रमुख, फळ संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.पंडित मुंडे, प्राचार्य, कृषि तंत्र विद्यालय, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच प्रशिक्षण समन्वयक व विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, श्री.अशोक निर्वळ आदींची उपस्थिती होती.


यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मा.डॉ. इन्द्र मणि म्हणाले कि, महिला या आपल्या समाजाचा आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया असून महिलांचा विकास म्हणजे समाजाचा विकास असतो. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक उन्नती आवश्यक आहे. त्यामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विस्तार कार्यक्रमांचे नियमितपणे आयोजन करण्यात यावे.  तसेच महिलांनी देखील प्रशिक्षणाचे महत्व ओळखून घ्यावे आणि त्यातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग हा स्वतःच्या आणि कुटुंबाच्या विकासासाठी करावा. एक दिवसात पाहिजे ते बद्दल होत नसतात परंतु दररोज सातत्याने प्रयत्न केल्यास एक दिवस हवा तो बदल नक्की होतो. तसेच महिलांनी आपल्या कुटुंबाच्या निर्णय प्रक्रीयेमध्ये देखील सहभागी होणे आवश्यक आहे. या सर्वांसाठी कृषि विद्यापीठा अंतर्गत विविध संस्था द्वारे घेण्यात येणारे विविध विस्तार आणि प्रशिक्षण कार्यक्रम हे अत्यंत महत्वपूर्ण ठरू शकतात.

मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती देऊन या प्रकल्पांतर्गत पुढील काळात घेण्यात येणाऱ्या विस्तार कार्यक्रमा बाबत माहितीत दिली. मा.डॉ.अनिता जिंतूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले







Wednesday, March 12, 2025

शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य व विस्तार कार्यकर्ते यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न


शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य व विस्तार कार्यकर्ते यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर, फ्रेंडस् ऑफ वुमेन्स वर्ल्ड बँकिंग इंडिया, अहमदाबाद,गुजरात संस्थेअंतर्गत लोकसाथी प्रतिष्ठान संस्था व मानव ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ मार्च, २०२५ रोजी शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य व विस्तार कार्यकर्ते यांच्यासाठी "नैसर्गिक शेती पद्धती व संवाद कौशल्य विकास" या विषयावर एक दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ यांची उपस्थिती होती. तसेच संस्थेचे मा.श्री.कमलाकर रायबोले, मा.श्री.नितीन कोल्हे, मा.श्री.गणेश सोनवणे आणि केव्हीकेचे  डॉ.बस्वराज पिसुरे, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण), डॉ.अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), डॉ.संजूला भावर, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), श्री.विवेक पतंगे, कार्यक्रम सहायक तसेच राजे संभाजी शेतकरी उत्पादक कंपनी, खुलताबादचे संचालक मा.श्री.भास्कर वेताळ आणि पाताळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, बदनापूरचे संचालक मा.श्री.नामदेव भुजंग यांच्यासह सदस्य यांची उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ.दिप्ती पाटगावकर म्हणाल्या की, नैसर्गिक शेती ही आजच्या काळाची गरज असून शेतकऱ्यांनी हळूहळू नैसर्गिक शेतीकडे जाणे आवश्यक आहे. तसेच विविध निविष्ठांची निर्मिती आपल्याच शेतीवर करून त्यांचा प्रभावीपणे वापर आपल्या शेतात करणे आवश्यक आहे. पुढच्या येणाऱ्या पिढीला शाश्वत आणि समृद्ध शेती द्यायची असेल तर नैसर्गिक शेतीकडे जाणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक विस्तार कार्यकर्त्यांनी विस्तार कार्यक्रम आयोजित करत असताना संवाद कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. योग्य संवाद कौशल्य हे यशस्वी विस्तार कार्यक्रमासाठी अत्यंत आवश्यक आहे.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना श्री.विवेक पतंगे यांनी शाश्वत शेतीसाठी मृदा संवर्धन या विषयावर तर डॉ.अनिता जिंतूरकर यांनी नैसर्गिक शेतीमध्ये पशुधनाचे महत्व, डॉ.संजूला भावर यांनी फळपिकांमध्ये नैसर्गिक निविष्ठांचा प्रभावी वापर आणि फळबाग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. तर डॉ.बस्वराज पिसुरे यांनी नैसर्गिक शेतीची ओळख व गरज, नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा निर्मिती आणि विस्तार कार्यकर्त्यांसाठी संवाद कौशल्य विकास या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे शास्त्रज्ञांनी निरसन केले. हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला असून आमच्या पुढील शेती आणि विस्तार कार्यक्रम  नियोजनासाठी याचा नक्कीच फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली. श्री.गणेश सोनवणे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी तेसाठी श्री.जयदीप बनसोडे, श्री.जयदेव सिंगल, श्री.विशाल दाभाडे यांनी नियोजन केले.














Saturday, March 8, 2025

जागतिक महिला दिवस-२०२५ केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे उत्साहात साजरा

 

जागतिक महिला दिवस-२०२५ उत्साहात साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी कृषी विद्यान केंद्र, छत्रपती संभाजीनगर आणि वॉटर फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ०८ मार्च,२०२५ रोजी कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे  जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाची प्रस्तावना वॉटर फाउंडेशन चे श्री.राठोड यांनी केले. तर डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी शेतकरी  महिलांना  आर्थिक उन्नतीसाठी प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया व मूल्यवर्धना बदल सखोल मार्गदर्शन केले.




Friday, March 7, 2025

ढोरकीन, ता.पैठण जि. छत्रपती संभाजीनगर येथे प्रक्षेत्र दिन संपन्न

 

ढोरकीन, ता.पैठण जि. छत्रपती संभाजीनगर येथे प्रक्षेत्र दिन संपन्न

वनामकृवि, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर आणि नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०७ मार्च, २०२५ रोजी ढोरकीन, ता.पैठण येथे प्रक्षेत्र दिवस घेण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड चे पदाधिकारी श्री. सुधीर पाटील यांनी बेन्टोनाईट सल्फर चा पीकासाठी उपयोग व महत्व या विषयावर शेतक-यांना मार्गदर्शन केले. तसेच केव्हीकेचे शास्त्रज्ञ प्रा. अशोक निर्वळ यांनी केव्हीकेतील उपलब्ध निविष्ठा तसेच सद्यस्थितीमध्ये पीक व्यवस्थापन या विषयावर शेतक-यांना मार्गदर्शन केले. सदर प्रक्षेत्र दिन हा महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार विजेते प्रगतशील शेतकरी श्री.यज्ञेश कातबने यांच्या शेतावर घेण्यात आला.



महिला बचत गटांच्या मालाचे बाजारपेठ व महिला सबलीकरण यावर मार्गदर्शन कार्यक्रम

 


महिला आर्थिक विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवा चे उद्घाटन दिनांक ०७ मार्च, २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर चे मा.जिल्हाधिकारी श्री.दिलीप स्वामी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर चे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विकास मीना व जिल्ह्याचे मा.पोलीस अधीक्षक श्री.राठोड साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी महिला बचत गटांच्या मालाचे बाजारपेठ व महिला सबलीकरण बद्दल केव्हीके, छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांचे मान्यवर, महिला शेतकरी, महिला उद्योजक, शेतकरी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.






परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न


परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

वनामकृवि,परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या टीएसपी प्रकल्पांतर्गत दिनांक ०६ मार्च, २०२५ रोजी हळदा, ता.सिल्लोड येथे "परसबागेतील कुक्कुटपालन" या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर तसेच डॉ.अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांनी उपस्थित शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरले असून यामुळे आम्ही परसबागेतील कुक्कुटपालन आणखी चांगल्या पद्धतीने करू शकू, अशी प्रतिक्रिया उपस्थित प्रशिक्षणार्थींनी दिली.




Saturday, March 1, 2025

१०८ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न


अडचणींना न घाबरता कार्य करत गेल्यास उद्योग उभारणीत नक्कीच यश येते - श्रीमती.छायाताई साबदे

१०८ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र,पैठण रोड,छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत दिनांक ०१ मार्च २०१५ रोजी १०८ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर या होत्या. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी उद्योजिका श्रीमती.छायाताई साबदे, श्री.अशोक निर्वळ, विषय विशेषज्ञ, कृषी हवामानशास्त्र, डॉ.संजूला भावर, विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, डॉ.बस्वराज पिसुरे, विषय विशेषज्ञ, विस्तार शिक्षण यांची उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्ष मार्गदर्शन करताना डॉ.दिप्ती पाटगावकर म्हणाल्या की, कृषी उद्योग उभा करताना अभ्यास आणि प्रशिक्षण असणे गरजेचे आहे. कृषी उद्योग उभारणीसाठी केव्हीके मार्फत नियमित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. आपल्या आसपास अशा बऱ्याच उद्योजिका आहेत ज्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. त्यातूनच त्या पूढे जातील आणि त्यांचा आदर्श इतर शेतकरी बंधू भगिनी घेतील.

कृषी विज्ञान केंद्र मार्फत विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात आणि ज्याद्वारे आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला उद्योजक तयार झालेले आहेत. शेतकरी बंधू-भगिनींना कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण द्यायचे असेल तर कृषी विज्ञान केंद्र आपल्या पाठीशी असून शेतकरी बांधवांनी कृषी विज्ञान केंद्र शी संपर्क करावा.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शक करताना श्रीमती. छायाताई साबदे यांनी त्यांनी स्वतः सुरू केलेल्या त्यांच्या सिद्धी गृह उद्योगाविषयी विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, प्रत्येक उद्योगाची सुरुवात ही शून्यातूनच करावी लागते आणि त्यासाठी आपल्या आसपास असलेल्या सर्व यंत्रणांचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. योग्य मार्गदर्शन आणि आपले योग्य कार्य असेल तर आपण उद्योग हा चांगल्या पद्धतीने उभा करू शकतो. उद्योग उभा करत असताना बऱ्याच अडचणी येतात. अडचणी आल्या तरच आपण त्यातून काहीतरी शिकतो आणि त्या पद्धतीने आपण आपले कार्य हे चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यामुळे अडचणींवर मात करत गेल्यानंतरच यशस्वी उद्योजक घडतो. सर्व शेतकरी बांधवांनी अडचणींना न घाबरता त्यावर मात करून योग्य मार्गदर्शन घेऊन सर्व शासकीय यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली जर उत्तम पद्धतीने कार्य केले तर त्यांना उद्योग चांगल्या पद्धतीने उभा करता येऊ शकतो. उद्योग उभा करण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत तांत्रिक मार्गदर्शन तर कृषी विभाग असेल कृषी पणन महामंडळ असेल अशा विविध यंत्रणामार्फत तुम्हाला बाजारपेठ आणि आर्थिक सहकार्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आज जवळपास २५ प्रकारचे विविध प्रॉडक्ट आमच्या मार्फत तयार केले जातात. आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सुरुवातीला काही किलो मध्ये विक्री होत असलेले प्रॉडक्ट्स आज अधिकच्या मागणीमुळे पुरवठा करणे अवघड जात आहे. महाराष्ट्रात सर्वदूर आमच्या प्रॉडक्ट्स ला मागणी आहे. हे सर्व पदार्थ हे सर्व प्रॉडक्ट हे कुठलेही रसायने न वापरता तयार केले जातात त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे.

यावेळी डॉ.संजूला भावर यांनी सध्या परिस्थितीतील फळबाग व्यवस्थापनाविषयी माहिती देताना सांगितले की, फळबागांमध्ये सध्या नैसर्गिक आच्छादनांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. फळबागांची लागवड करताना जमिनीचा प्रकार, आरोग्य, पाण्याची व मजुरांची उपलब्धता या सर्व बाबींचा विचार करून पीक निवडावे. कांदा पिकामध्ये खत व्यवस्थापन हे फार महत्त्वाचे असून पहिल्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण खत हे कांद्याला दिले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच आंबा पिकातील सद्य परिस्थिती व्यवस्थापन याबद्दल सविस्तर त्यांनी माहिती दिली. श्री.अशोक निर्वळ यांनी हवामान बदलानुसार पिकामध्ये कोणकोणती कामे केली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हवामान कसे असेल आणि त्या पद्धतीने शेतकरी बांधवांनी प्रत्येक पिकांमध्ये कोणकोणती कामे केली पाहिजेत याबद्दल सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शेतकरी बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी होते.

मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...