Saturday, January 24, 2026

काटेकोर नियोजन केल्यास ऊसाचे उच्च उत्पादन मिळू शकते - मा.डॉ.राकेश अहिरे


काटेकोर नियोजन केल्यास ऊसाचे उच्च उत्पादन मिळू शकते - मा.डॉ.राकेश अहिरे

८२ वा शेतकरी शास्त्रज्ञ ऑनलाइन सुसंवाद कार्यक्रम संपन्न

विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ जानेवारी, २०२६ रोजी ८२ वा ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी चे माननीय संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.राकेश अहिरे, मा.श्री.सुरेश काळे, मुख्य ऊस विकास अधिकारी, माळेगाव सहकारी साखर कारखाना, बारामती मा.डॉ.प्रशांत देशमुख, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी, वनामकृवि, परभणी, मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ तसेच विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, डॉ.अनिता जिंतूरकर, श्री.अशोक निर्वळ, विविध विभागाचे शास्त्रज्ञ, अधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना मा.डॉ.राकेश अहिरे म्हणाले की, ऊस पिकामध्ये उच्च उत्पादन घेण्यासाठी गुणवत्ता युक्त बेण्याची निवड, योग्य लागवड अंतर, संतुलित पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन या गोष्टी शेतकरी बांधवांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच श्री.काळे यांनी अवलंबलेल्या उच्च ऊस उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल विद्यापीठ स्थरावर देखील अभ्यास केला जाईल.

यावेळी एकरी ४०० टन ऊस उत्पादन या विषयावर मार्गदर्शन करताना मा.श्री.सुरेश काळे म्हणाले की, ऊसाचे उत्पादन वाढण्यासाठी सूर्यप्रकाश एक महत्त्वाचा घटक असून एकरी ४०० टन ऊसाचे उत्पादन मिळू शकते. सूर्यप्रकाश हा ऊस उत्पादन वाढण्यासाठी प्रमुख घटक असल्याचे मत काळे यांनी व्यक्त केले. ऊस पिकासाठी १०० टक्के सूर्यप्रकाश मिळाल्यास एकरी ४०० टन उत्पादन मिळू शकतो, याची कल्पना सुचली. स्टेजिंग करून उसाला पडण्यापासून वाचवले आणि ऊस सरळ उभा राहण्यास मदत झाली तर त्याला जास्तीचा सूर्यप्रकाश मिळून अधिक उत्पादन मिळू शकते. स्वतःच्या १३ गुंठे क्षेत्रावर प्रयोग त्यांनी केला. जेथे पीक घेतले ती जमीन क्षारयुक्त असून, जवळपास १३०० टीडीएस असणारे पाणी अशा क्षेत्रांमध्ये स्टेजिंग पद्धत वापरून ८६०३२ या जातीच्या उसाची लागवड केली. जवळपास एकरी ४०० टन उसाचे उत्पादन मिळू शकते, असे मत श्री.काळे यांनी व्यक्त केले.

मा.श्री.सुरेश काळे यांच्या म्हणण्यानुसार, काही ऊस उत्पादक शेतकरी एकरी १०० टन ऊस उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. तज्ज्ञांच्या मते यासाठी प्रति एकरी ३५ ते ४० हजार उसाची संख्या असावी, तसेच प्रत्येक उसाचे वजन २.५ ते ३ किलो असावे, जेणेकरून प्रतिएकरी १०० टन ऊस उत्पादन मिळते. यासाठी पट्टा पद्धत, ऊस रोपांचा वापर, सेंद्रिय खते, ठिबक सिंचनाचा वापर, वेगवेगळ्या फवारण्या आदींचा उपयोग केल्यास एकरी १०० टन उत्पादन मिळू शकते. परंतु, असा जोपासलेला ऊस ७ ते ८ महिन्यानंतर वाऱ्यामुळे किंवा त्याच्या स्वतःच्या वजनामुळे संपूर्णतः जमीनलगत पडतो. पडलेला ऊस जिवंत राहण्यासाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असते. पडलेल्या उसास खूप प्रयत्न करून जिवंत राहावे लागते यामध्ये उसाची ६० टक्के ऊर्जा वाया जाते. त्यामुळे अशा उसाचे वजन २ ते ३ किलोपेक्षा जास्त मिळणे खूप जिकिरीचे ठरते. हे टाळण्यासाठी स्टेजिंग करावे लागेल. एक वेळेस ऊस लागवड केल्यानंतर कमीत-कमी उसाचे पुढे ५ ते ७ खोडवे पीक घेणे शक्य आहे. उसाला एकदा स्टेजिंग केलेला खर्च पुढे १५ ते २० वर्षापर्यंत करण्याची गरज नाही.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निराकरण तज्ज्ञांद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी केले तर  सूत्रसंचालन व आभार डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केले.

****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account

Saturday, January 17, 2026

शेतकऱ्यांना सक्षम आणि समृद्ध बनवण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी सर्वात प्रभावी माध्यम - मा.डॉ.राकेश अहिरे

शेतकऱ्यांना सक्षम आणि समृद्ध बनवण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी सर्वात प्रभावी माध्यम - मा.डॉ.राकेश अहिरे

विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ जानेवारी, २०२६ रोजी ८१ वा ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी चे माननीय संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.राकेश अहिरे, मा.श्री.भूषण निकम, चेअरमन, कृषिभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन (महाराष्ट्र राज्य), मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ तसेच विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, डॉ.अनिता जिंतूरकर, श्री.अशोक निर्वळ, विविध विभागाचे शास्त्रज्ञ, अधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना मा.डॉ.राकेश अहिरे म्हणाले की, शेतकऱ्यांना सक्षम आणि समृद्ध बनवण्यासाठी त्यांना एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. शेतकऱ्यांना विविध कृषी व्यवसाय सुरू करून त्यातून अधिक आर्थिक नफा आणि त्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना करून एकजुटीने काम करावे.

यावेळी शेतकरी उत्पादक कंपनी द्वारे समृद्ध शेतकरी याविषयी मार्गदर्शन करताना मा.श्री.भूषण निकम यांनी सांगितले की, कोणत्याही शेतकरी बांधवांना कृषी उद्योग उभारणी करायची असेल तर तसे विचार आणि ज्ञान अंगीकृत करणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण उद्योग करण्याचा विचार करणार नाही आणि काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत यशस्वी उद्योग उभारणी शक्य होत नाही. हे सर्व करायचे असेल तर शेतकरी बांधवांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून त्याद्वारे विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे.

यावेळी त्यांनी सांगितले कि, गावपातळीवरील १० शेतकरी किंवा शेतकरी गट एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतात. यासाठी ५ संचालक व ५ सदस्य असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये कमीतकमी १ महिला संचालक असेल तर याचा फायदा होतो. तसेच एकापेक्षा जास्त गावे मिळून देखील शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली जाऊ शकते. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेसाठी ५ संचालक व ५ सदस्य यांचे जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड (मूळप्रत /स्कॅन), आधार कार्ड (मूळप्रत / स्कॅन), लाईट बिल / दोन महिन्यातील बैंक स्टेटमेंट, ४ फोटो (मुळप्रत किवा JPEG format), ७/१२ उतारा (झेरोक्स / pdf), शेतकरी असल्याचा दाखला, ऑफिस पत्त्यासाठी लाईट बिल, सोबत दिलेला फॉर्म भरून देणे, कंपनीसाठी नाव, संचालकांचे नाव, मोबाईल क्रमांक, ऑफिस पत्ता त्यासाठी लाईट बिल इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते. यातील बरेचशे कामे ही सीए आणि सीएस कडून करून घ्यावे लागतात. तसेच श्री.भूषण निकम म्हणाले की, केवळ कंपनी स्थापन करणे हा उद्देश असून नये. कंपनी स्थापन झाल्यास आपल्या परिसरातील सर्व मार्केटचा अभ्यास करून त्यानुसार उद्योग उभारणी करावी. तसेच कृषीमालाला परदेशात प्रचंड संधी असून शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊन कृषीमालाच्या निर्यातीकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निराकरण तज्ज्ञांद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी केले तर आभार डॉ.संजूला भावर आणि सूत्रसंचालन डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केले.









****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account

Saturday, January 10, 2026

मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू, वनामकृवि, परभणी यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉल ला भेट

मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉल ला भेट

विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू-भगिनीं, विद्यार्थ्यांची केव्हीकेच्या स्टॉलला मोठ्या संख्येने भेट

ॲग्रोवन कृषी प्रदर्शन-२०२६

दिनांक ०९ जानेवारी २०२६ पासून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन सुरू झाले. या प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे स्टॉल लावण्यात आलेला आहे. या स्टॉलला मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्यासह मा.डॉ.राकेश अहिरे, संचालक विस्तार शिक्षण, वनामकृवि, परभणी, मा.डॉ.सुर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प,छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.दिपक पाटील, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषि महाविद्यालय, बदनापूर तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी मा.श्री.दादासाहेब शिंदे यांनी दि.१० जानेवारी, २०२६ रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी केव्हीकेच्या विविध उपक्रमाबाबत माहिती जाणून घेतली. केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ मार्फत कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर, श्री.विवेक पतंगे, श्रीमती.करुणा शिंदे, श्री.जयदीप बनसोडे, श्री.विशाल दाभाडे, श्री.जयदेव सिंगल आदी कर्मचाऱ्यांनी सर्व मान्यवर, शेतकरी बंधू भगिनींचे स्वागत करून विविध उपक्रम आणि तंत्रज्ञाना बद्दल सविस्तर माहिती दिली.

या प्रदर्शनात छत्रपती संभाजीनगर चे विभागीय कृषि सह संचालक मा.श्री.वानखेडे सर यांच्यासह छत्रपती संभाजीनगर च्या प्रकल्प संचालक आत्मा, मा.श्रीमती. धनश्री जाधव आणि कृषि विभागातील विविध पदाधिकाऱ्यांनी  तसेच शेतकरी बंधू भगिनी, कृषि उद्योजक, विद्यार्थी यांनी केव्हीकेच्या स्टॉलला दिनांक ०९.०१.२०२६ रोजी भेट दिली होती.

केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉलवर विविध कृषी तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली जात आहे. ज्यामध्ये नैसर्गिक शेती, जैविक खते, जैविक बुरशीनाशके, कुक्कुटपालन, शेळीपालन, कृषी विज्ञान केंद्राचे विविध उपक्रम, फळबाग लागवड, फुलशेती, कृषी हवामान सल्ला पत्रिका, किसान सारथी, कृषी अभियांत्रिकी, ड्रोनचा शेतीसाठी वापर व इतर विविध विषयावर सविस्तर माहिती दिली जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू भगिनी आणि विद्यार्थी केवहिकेच्या स्टॉलला मोठ्या संख्येने भेटी देऊन माहिती घेत आहेत. हे प्रदर्शन १२ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू असून कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलला जास्तीत जास्त शेतकरी बंधू भगिनीं, विद्यार्थ्यांनी भेट द्यावी असे आवाहन मा.कर्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे.








****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account







मौजे पांगरी ता.सिल्लोड येथे सुधारीत कापुस लागवड तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

मौजे पांगरी ता. ‍सिल्लोड येथे सुधारीत कापुस लागवड तंत्रज्ञान 

शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


भा. कृ. अनु. प. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर -१ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारमार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ द्वारे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी पांगरी येथील सरपंच, मा. श्री दत्तु हरी पंडीत विशेष उपस्थित वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, नोडल अधिकारी डॉ. दिप्ती पाटगावकर, प्रकल्पाचे उप-अन्वेषक विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) डॉ.बस्वराज पिसुरे,  विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) डॉ.ए.एस.जिंतुरकर, बीटीएम आत्मा श्री. एम.एस.कुंभार, सासुरवाडा येथील सरपंच श्री साहेबराव लक्ष्मण दांडगे प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षक श्री. सतिष कदम, श्री. जयदेवसिंग सिंगल  या सर्वांचा उपस्थितीत दि ०८.०१.२०२५ रोजी मौजे पांगरी ता. ‍सिल्लोड येथील प्रगतिशील शेतकरी श्री विष्णु हरी पंडीत यांच्या कापूस प्रक्षेत्रावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञाना विषयी सविस्तर माहिती दिली. कापसाच्या उत्पादन वाढीकरिता योग्य अंतर, गळ फांदी काढून टाकणे, शेंडा खुडून झाडांची उंची पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी ठेवून फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवून उत्त्पादनात वाढ होईल, शेतकऱ्यांनी पुढील वर्षी कमी अंतराचा व सघन लागवड तंत्रज्ञानानुसार लागवड करून कापसांचे उत्पन्न वाढवावे. येणाऱ्यां काळात नैसर्गिक शेती बद्दलचे महत्त्व याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

डॉ.बस्वराज पिसुरे यांनी सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहे, कपाशीतील किडी व रोगांचे व्यवस्थापन, पिवळे व निळे चिकट सापळे शेतात लावावे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे लावावेत तसेच पराटीची कुट्टी करावी, त्यामुळे शेतात २-३ टन येवढा खत तयार होतो, व सेंद्रिय कर्ब वाढतो असे ते म्हणाले.शेतात होणारा हूमणी अळीचा प्रादुर्भाव यासाठी काय उपाययोजना कराव्यात या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. माती परीक्षण करून घेऊनचं पिकांचे नियोजन करावे. प्रकल्पाचे उद्देश शेतकऱ्यांना समजावुन सांगितले. 

डॉ.ए.एस. जिंतुरकर, यांनी सध्या परिस्थित पशुधनाची घ्यावयाची काळजी, शेळी पालन, कुक्कुटपालन, याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्री. एम.एस. कुंभार यांनी कृषि विभागाच्या विविध योजनेची व कृषि विस्तार एआय ॲप बद्दल माहीती दिली. तसेच सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान प्रगतिशील शेतकरी श्री. विष्णु हरी पंडीत यांनी या तंत्रज्ञानामुळे कसा फायदा झाला याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्री. सतिष कदम आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सतिष कदम, श्री जयदेव सिंगल, श्री. विष्णु हरी पंडीत, यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.








****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account



कृषी विद्यापीठाच्या केव्हीके व इतर विविध कार्यालयात उपलब्ध जैविक निविष्ठांचा वापर शेतकऱ्यांनी करावा- मा.डॉ.राकेश अहिरे

                            ८० वा शेतकरी शास्त्रज्ञ ऑनलाईन सुसंवाद उपक्रम कार्यक्रम संपन्न

कृषी विद्यापीठाच्या केव्हीके व इतर विविध कार्यालयात उपलब्ध जैविक निविष्ठांचा वापर शेतकऱ्यांनी करावा- मा.डॉ.राकेश अहिरे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी ८० वा शेतकरी शास्त्रज्ञ ऑनलाईन सुसंवाद उपक्रम कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू, वनामकृवि, परभणी, मा.डॉ.राकेश अहिरे, संचालक विस्तार शिक्षण, वनामकृवि, परभणी, मा.डॉ.पी.एन.मीना, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भा.कृ.अनु.प- केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संशोधन संस्था, नवी दिल्ली, मा.डॉ.प्रशांत देशमुख, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी, वनामकृवि, परभणी, केव्हीके च्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.संजूला भावर, श्री.अशोक निर्वळ यांच्यासह विद्यापीठातील आणि कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता.

यावेळी डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी मा.डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू, वनामकृवि, परभणी हे या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना म्हणाले की, जैविक निविष्ठांची निर्मिती बद्दल शेतकरी बांधवाना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देणे आवश्यक आहे आणि यासाठी विद्यापीठ मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवत आहे.

मा.डॉ.राकेश अहिरे, संचालक विस्तार शिक्षण, वनामकृवि, परभणी हे कार्यक्रमात मार्गदर्शन करताना म्हणाले की, जैविक निविष्ठांचा जसे की बायोमिक्स, जैविक खते हे शेतीची शाश्वतता जपण्यासाठी येणाऱ्या काळाची गरज आहेत. यांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी वापर करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी यावेळी सांगितले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी द्वारे विकसित बायोमिक्स, जैविक खते, द्रवरूप जिवाणू संघ हे आपल्या मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात असणाऱ्या कृषी विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रे, विविध संशोधन व विस्तार संस्थेवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यापुढेही विद्यापीठामार्फत दर्जेदार जैविक निविष्ठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यावर तसेच यावरील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना मा. डॉ. पी. एन. मीना म्हणाले की, आपल्या विविध पिकांवर येणाऱ्या सर्व रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी जैविक निविष्ठा, जैविक घटक उपलब्ध आहेत. शेतकरी बांधवांनी यांची माहिती घेऊन त्यांचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी मोसंबी, आंबा, ऊस, तूर, अद्रक इत्यादी पिकांमधील कीड व रोगांची लक्षणे, नुकसानीचा प्रकार आणि त्यांचे जैविक निविष्ठांच्या वापरातून एकात्मिक नियंत्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, ट्रायकोडर्मा, बिव्हीरिया, बॅसिलस, सुडोमोनास, मेटारायझीयम या निविष्ठांचा पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेपासूनच नियमितपणे वापर करणे आवश्यक आहे. आपल्या जवळच्या केव्हीके मध्ये या सर्व निविष्ठा उपलब्ध असून त्या फार प्रभावी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी जैविक निविष्ठांचा शेतावर कशा प्रकारे वाढवा करावा याबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की २०० लिटर च्या ड्रम मध्ये १७०-१७५ लिटर पाणी, ०५ किलो गायीचे शेण, ०५ किलो गूळ, २०० ग्रॅम बेसन पीठ, ०१ किलो उकडलेले बटाटे आणि २.५ लिटर बायोमिक्स कल्चर यांचे मिश्रण करावे व ड्रम चे तोंड पोत्याने बांधून सावलीत ठेवून करून दररोज दोन वेळा लाकडाने हलवावे. असे ८-१० दिवस केल्यानंतर याचे चांगले जैविक द्रावण तयार होते. त्यानंतर शेतकरी बांधव याचा वापर आपल्या शेतीसाठी करू शकतात. तसेच बांधावरील जैविक निविष्ठा निर्मिती प्रयोगशाळा निर्मितीसाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि सदर प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांच्या संस्थेला शेतकऱ्यांनी संपर्क करावा असे सांगितले.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनी सहभागी होते. सदर कार्यक्रम हा फार महत्वपूर्ण ठरला असून या विषयावरील आणखी कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत असे यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी बांधवांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे उपस्थित शास्त्रज्ञा मार्फत देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केले.













****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account

विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू-भगिनीं, विद्यार्थ्यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉलला मोठ्या संख्येने भेट


विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू-भगिनीं, विद्यार्थ्यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉलला मोठ्या संख्येने भेट

ॲग्रोवन कृषी प्रदर्शन-२०२६

दिनांक ०९ जानेवारी २०२६ पासून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन सुरू झाले. या प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे स्टॉल लावण्यात आलेला आहे. या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी स्टॉलला छत्रपती संभाजीनगर चे विभागीय कृषि सह संचालक मा.श्री.वानखेडे सर यांच्यासह मा.डॉ.सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प,छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरच्या प्रकल्प संचालक आत्मा मा.श्रीमती. धनश्री जाधव यांच्यासह कृषि विभागातील विविध पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकरी बंधू भगिनी विद्यार्थ्यांनी केव्हीकेच्या स्टॉलला ला भेट दिली. 

केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ मार्फत डॉ.संजूला भावर, डॉ.अनिता जिंतूरकर, श्री.विवेक पतंगे, श्री.जयदीप बनसोडे, श्री.विशाल दाभाडे आदी कर्मचाऱ्यांनी सर्व मान्यवर, शेतकरी बंधू भगिनींचे स्वागत करून विविध उपक्रम आणि तंत्रज्ञाना बद्दल सविस्तर माहिती दिली.

केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या स्टॉलवर विविध कृषी तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली जात आहे. ज्यामध्ये नैसर्गिक शेती, जैविक खते, जैविक बुरशीनाशके, कुक्कुटपालन, शेळीपालन, कृषी विज्ञान केंद्राचे विविध उपक्रम, फळबाग लागवड, फुलशेती, कृषी हवामान सल्ला पत्रिका, किसान सारथी, कृषी अभियांत्रिकी, ड्रोनचा शेतीसाठी वापर व इतर विविध विषयावर सविस्तर माहिती दिली जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू भगिनी आणि विद्यार्थी केवहिकेच्या स्टॉलला मोठ्या संख्येने भेटी देऊन माहिती घेत आहेत. हे प्रदर्शन १२ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू असून कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलला जास्तीत जास्त शेतकरी बंधू भगिनीं, विद्यार्थ्यांनी भेट द्यावी असे आवाहन मा.डॉ.दिप्ती पाटगावकर कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या मार्फत करण्यात येत आहे.






****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account




मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...