Friday, July 25, 2025

कीड व रोग निरीक्षण व व्यवस्थापनासाठी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर

 

कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ व भा.कृ.अनु.प - राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संशोधन संस्था, नवी दिल्लीच्या शास्त्रज्ञ व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग

कीड व रोग निरीक्षण व व्यवस्थापनासाठी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर तसेच भा.कृ.अनु.प - राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संशोधन संस्था, नवी दिल्ली यांच्यामार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आंबा, मोसंबी, तूर या पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने सद्यपरिस्थितीतील विविध पिकांचे कीड व रोग यांचे निरीक्षण व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी भा.कृ.अनु.प - राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संशोधन संस्था, नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञांच्या चमूने विविध ठिकाणी भेटी देऊन मार्गदर्शन केले. यामध्ये प्रमुख शास्त्रज्ञ मा.डॉ.अजंता बिरा, शास्त्रज्ञ मा.डॉ.प्रभू नारायण मीना, मा.डॉ.राघवेंद्र, मा.डॉ.मुकेश खोकड यांचा सहभाग होता. यांच्यासोबत पैठणचे तालुका कृषी अधिकारी मा.श्री.विकास पाटील, कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगरच्या प्रमुख शास्त्रज्ञ मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ मा.डॉ.संजूला भावर, डॉ.बस्वराज पिसुरे, उप कृषी अधिकारी मा.श्री.वाघचौरे सर, सहायक कृषी अधिकारी मा.श्री.चौधरी सर, मा.श्री. कुसळकर सर, केव्हीकेचे कर्मचारी श्री.जयदीप बनसोडे, श्री.प्रमोद जाधव, श्री.किशोर शेरे आदी अधिकारी, कर्मचारी यांनी दिनांक २४  व २५ जुलै २०२५ रोजी या दोन दिवसात पैठण तालुक्यातील धनगाव, पाचलगाव, बोरगाव, वाहेगाव, वरुडी (बु), वडवळी इत्यादी गावांमध्ये जाऊन शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम व शेतकऱ्यांच्या शेतावर भेटीचे आयोजन  करून विविध विषयांवर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध पिकावर आलेल्या किडीं व रोगांबाबत शास्त्रज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मोसंबी मधील फळगळ, मोसंबीतील कोळीचे व्यवस्थापन, कापूस पिकातील रस शोषण करणाऱ्या किडी, तुर पिकातील कीड व्यवस्थापन, आंबा पिकातील खोडकिडा तसेच मँगो मालफॉर्मेशन इत्यादी विविध कीड व रोगांविषयी शास्त्रज्ञा मार्फत शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.

या भेटीदरम्यान मा.श्री.वसंतराव कातबने,  मा.श्री.नानासाहेब बोंबले मा.श्री.महेश बोंबले, मा.श्री.ज्ञानेश्वर बोंबले, मा.श्री.गोरखनाथ बोबडे, मा.श्री.नागरगोजे सर, मा.श्री.मनोज शिंदे, मा.श्री.अशोक बोबडे, मा.श्री.नारायण बोबडे, मा.श्री.योगेश बोबडे, मा.श्री.काळे सर, मा.श्री.आकृर गलधर यांच्यासह विविध गावातील शेतकरी बांधव सहभागी होते. ज्यांनी कीड व रोग व्यवस्थापनाचे आपले अनुभव उपस्थित शास्त्रज्ञांना सांगतीले व या भेटीदरम्यान सांगण्यात आलेले तंत्रज्ञान त्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.































****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/

Wednesday, July 23, 2025

उत्कृष्ट सादरीकरण प्रमाणपत्र देऊन केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ सन्मानित

 



कृषि विज्ञान केंद्रांची आठवी वार्षिक विभागीय कार्यशाळा संपन्न 

उत्कृष्ट सादरीकरण प्रमाणपत्र देऊन केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ सन्मानित 

भा.कृ.अनु.प-अटारी, पुणे यांच्यामार्फत दिनांक २०-२२ जुलै, २०२५ या दरम्यान भूज, गुजरात येथे अटारी झोन-VIII अंतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यातील सर्व कृषि विज्ञान केंद्रांची आठवी वार्षिक विभागीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये या तीन राज्यातील ८२ कृषि विज्ञान केंद्रांनी त्यांचे सन २०२४ चे वार्षिक प्रगती अहवाल सादर केले. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर चा वर्ष २०२४ चा वार्षिक प्रगती अहवाल केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी संबधित कार्यशाळेत सादर केला. वर्ष २०२४ मध्ये राबवण्यात आलेल्या विविध मोहीम, प्रकल्प, दर्जेदार व उत्तम निविष्ठा उपलब्धता, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच इतर विस्तार कार्यक्रम यांची माहिती यावेळी त्यांनी सादर केली. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी सन्मानीय कुलगुरू मा.डॉ.इन्द्र मणी, संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.राकेश अहिरे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोलाचे संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.डी. बी. उंदिरवाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर मार्फत करण्यात आलेले कार्य उल्लेखनीय असून यापुढेही अशाच प्रकारे कार्य करावे व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना याचा फायदा करून देण्यात यावा, असे उपस्थित मान्यवरांनी सांगतिले. मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी केलेल्या सादरीकरणास या कार्यशाळेत उत्कृष्ट सादरीकरण प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळीमा.डॉ.ए.के.सिंग, माजी कुलगुरू, बीएयु, सबौर, मा.डॉ.आर.एम.चौहान, कुलगुरू, एसडीएयु, एस के नगर, मा.डॉ.एम.एम.अधिकारी, माजी कुलगुरू, बीसीकेव्ही, मोहनपुर, मा.डॉ.पी.दास, माजी डीडीजी (कृषि विस्तार), भा.कृ.अनु.प,.नवी दिल्ली, मा.डॉ.के.डी.कोकाटे, माजी डीडीजी (कृषि विस्तार), भा.कृ.अनु.प,. नवी दिल्ली, मा.डॉ.प्रभु कुमार एस, माजी संचालक, भा.कृ.अनु.प-अटारी, बेंगलोर, मा.डॉ.एस.के.रॉय, संचालक, भा.कृ.अनु.प-अटारी, पुणे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांना सन्मानित करण्यात आले.





****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/

देशी गोवंश चे जतन ही काळाची गरज-डाॅ.अनिता जिंतुरकर

 





शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा 

देशी गोवंश चे जतन ही काळाची गरज-डाॅ.अनिता जिंतुरकर

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री मा.श्रीमती. पंकजाताई मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या निर्णयाचा अध्यादेश राज्य शासनाने निर्गमित केला आहे. त्याच अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, कृषि विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर-1 दि. येथे 22 जुलैला  2025  मंगळवार रोजी  "शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन" साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन डाॅ.अनिता जिंतुरकर, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) यांनी केले.
 राज्यात मराठवाडा विभागात देवणी, लाल कंधारी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिलार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ यांसारख्या देशी गायींच्या जाती आढळतात. मात्र, कमी उत्पादनक्षमता व प्रजनन क्षमतेमुळे या गायींच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. यामुळे त्यांचे जतन व संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे.पार्श्वभूमीवर, देशी गायींचे जतन व संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून अधिक उत्पादनक्षम देशी गायी तयार करण्याचे उद्दिष्ट शासनाने घेतले आहे. यासोबतच देशी गायींच्या दुध, शेण, गोमुत्राचे उत्पादन व विपणन यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.  
  
 मराठवाड्याची शान असलेल्या लाल कंधारी आणि देवणी या दोन गायींच्या जातींचं विशेष महत्त्व आहे. लाल कंधारी ही एक देशी गाय असून ती तिच्या काटकपणामुळे आणि दुष्काळात तग धरून राहण्याच्या क्षमतेमुळे ओळखले जाते. तर देवणी गाय तिच्या उत्कृष्ट दूध उत्पादनासाठी आणि बैलांच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. लाल कंधारी गाय ही  दुष्काळात तग धरून राहते, शेतीकामासाठी उपयुक्त बैल वापर होतो, कमीत कमी दिवसाला 4 ते 5 लिटर दूध देण्याची क्षमता आहे सर्वात महत्वाचे या गायी ची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असल्या करणाने गाय पालन साठी उपयुक्त आहे. मराठवाड्यात आढळणारी आणखी एक महत्त्वाची जात, जी तिच्या दूध आणि बैलांसाठी प्रसिद्ध आहे. ती म्हणजे "देवणी गाय" उपलब्ध  असणार्या ओल्या, सुक्या आणि निकृष्ट चाऱ्यामध्येही चांगली वाढ होते. शेतीकामासाठी मजबूत आणि देखणे बैल आणि उत्कृष्ट दूध उत्पादन म्हणुन ओळख आहे.
भारतीय गायीचे वशिंड (खांदा)आहे. या वशिंडात सूर्य किरणातील काही उपयुक्त किरण शोषून घेण्याची क्षमता आहे. या उपयुक्त किरणांमुळे गायीच्या जीन्स मध्ये प्राकृत शारीरिक प्रतिकारक्षमता तयार होते. ती क्षमता दुधात उतरते आणि असे पौष्टीक दूध मानवाला मिळते. देशी गाईचे दूध आईच्या दुधा इतकेच पौष्टीक शरीराचे उत्तम पोषण करणारे आहे, शिवाय मानव शरीर तंदुरुस्त व व्याधीमुक्त राहते. त्यामुळे पूर्वीच्या माणसांचं आयुष्यमान उत्तम होतं.अर्थात दूध हा गायीचा उपपदार्थ आहे. गाय दूध फक्त व्याल्यावर काही काळ देते. सतत देत नाही. गायीपासून कायम मिळणारा मुख्य पदार्थ म्हणजे शेण (गोमय) आणि मूत्र (गोमूत्र).
       गायीच्या शेणात व मुत्रात जीवाणू निर्माण करण्याची प्रचंड क्षमता असते. हे जीवाणू वनस्पतींना वाढीसाठी असणारे सेंद्रिय खत जमिनीत तयार करतात. त्यामुळे विषमुक्त अन्न निर्माण होते.जैविक.शेतीला प्राधान्य मिळते.कोणत्याही प्राण्याचे गोमूत्र टाकाऊ पदार्थ म्हणून टाकून दिले जाते पण जेव्हा गायीचा विचार केला जातो तेव्हा ते अगदी उलट असते. ते सर्व मानवजातीसाठी आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. गोमूत्राचा वापर सेंद्रिय आणि नैसर्गिक खते, कीटकनाशके आणि शेतीतील इतर उत्पादने तयार करण्यासाठी केला जातो. देशी गोवंश चे जतन करून त्यास उत्पादनाचे साधन म्हणून ग्रामीण युवक युवती ने पाहावे हा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने डाॅ.अनिता जिंतुरकर यांनी दिला.
       या कार्यक्रमात गोपालक, कृषि तंत्र विद्यालय छत्रपति संभाजीनगर, कृषि महाविद्यालय बदनापूर चे सातव्या सत्राचे विद्यार्थी असे एकूण ३० जणानी सहभाग नोंदविला

****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/

Friday, July 18, 2025

शाश्वत आंबा उत्पादन घेण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

 




आंबा उत्तम कृषि पद्धती एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

शाश्वत आंबा उत्पादन घेण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब करावा

मा.डॉ.इन्द्र मणि

             आंबा हे आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख पीक असून त्याबद्दल शास्त्रीय माहिती घेऊन त्याप्रमाणे लागवड करणे आवश्यक आहे. तसेच यातील निर्यात संधी बाबत शेतकरी बांधवांनी जाणून घेऊन उत्तम आंबा उत्पादनावर भर देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आंबा उत्तम कृषि पद्धती प्रशिक्षण कार्यक्रम सर्व शेतकरी बांधवांना फार उपयुक्त ठरणारा असा कार्यक्रम आहे. शेतकरी बाधवांसमोर विविध अडचणी आहेत. त्यामुळे सर्व शास्त्रज्ञ विभाग यांनी शेतकरी देवो भव: या भावनेने कार्य करण्याचा संकल्प करुन कार्य केले तर आपण बऱ्याच अडचणी सोडविण्यात यशस्वी होऊ व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास खुप मोठा फायदा होणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी द्वारे शेतकऱ्यांसाठी विविध विस्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत असून या विविध उपक्रमांची दाखल राष्ट्रीय स्थरावर देखील घेण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या सर्व विस्तार कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केले.

सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहासहाय्यित महाराष्ट्र ॲग्रो बिझनेट नेटवर्क (मॅग्नेटप्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे, कृषि विभाग, आत्मा, छत्रपती संभाजीनगर व वनामकृवि, परभणी अंतर्गत  केव्हीके,पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने  केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे  दि. १८ जुलै २०२५ रोजी आयोजित “आंबा- उत्तम कृषि पद्धती बाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठ, परभणीचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.डॉ.राकेश अहिरे, संचालक विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा.श्रीमती.अश्विनी पठारे, उपविभागीय कृषि अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.भगवानराव कापसे, आंबा तज्ञ, गटशेतीचे प्रणेते तथा उपाध्यक्ष महाकेशर महासंघ,छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१, मा.श्री.अरुण नादरे, विभागीय प्रकल्प अधिकारी, मॅग्नेट, छत्रपती संभाजीनगर  मा.श्री.हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, एमसीडीसी, पुणे, केबी एक्सपोर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड चे मा.श्री.लक्ष्मण पाटील, मा.श्री.समीर खिलारे, मॅग्नेट प्रकल्पाचे मा.श्री.मारुती पवार, मा.श्री. राहूल शेळके, कु.निशिगंधा देशमुख, मा.श्री.पांडुरंग भगत, व्यवस्थापक, न्यू लीफ डायनामिक टेकनॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, मा.श्री.सोमनाथ जाधव, व्यवस्थापक, ॲग्री प्लास्ट, पुणे, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर येथील विषय विशेषज्ञ मा.डॉ.संजूला भावर, मा.डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.बस्वराज पिसुरे, प्रा.अशोक निर्वळ यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार बंधू, विविध अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी बोलताना मा.डॉ.राकेश अहिरे म्हणाले कि, डाळींबाच्या लागवडी खालोखाल आंबा हे प्रमुख पीफळक छत्रपती संभाजीनगर मध्ये घेतले जाते. आंबा हे डाळींब पेक्षा कमी मशागतीचे पीक असून याद्वारे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊन अधिक आर्थिक नफा मिळवू शकतात. आंबा लागवड व निर्यातीस खुप मोठा वाव आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतींचा अभ्यास व अवलंब करावा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या सर्वच कृषि विज्ञान केंद्रांमार्फत अशा कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. याचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घ्यावा. माझा एक दिवा माझ्या बळीराजासाठी, ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम यासारखे अभिनव उपक्रम विद्यापीठा मार्फत आयोजित करण्यात येतात ज्यांचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा.

            यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना मा.डॉ.भगवानराव कापसे म्हणाले कि, आंबा पीक कोरडवाहु असल्याचा समज, चुकीच्या जमिनीची निवड, तंत्रज्ञानाचा अभाव, जास्त अंतरावरील लागवड हि आंब्यातील कमी उत्पादकतेची काही प्रमुख कारणे असून यामध्ये शेतकरी बांधवांनी बदल करणे आवश्यक आहे. घन ते अतिघन लागवड करावयाची असल्यास घेर नियंत्रण हे आलेच. त्यासाठी गरजेप्रमाणे बुटका / खुजा जातीची निवड, वाढ नियंत्रकाचा वापर, योग्य वेळेत योग्य पद्धतीने छाटणी या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. यामुळे सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग होतो, कार्बनडाय जड असल्यामुळे वातावरणात खालच्या थरात जास्त, बाग लवकर फळात येते त्यामुळे उत्तम प्रतीची फळे आणि जास्त उत्पन्न मिळते. अतिघन लागवड करताना लागवड ही औरस - चौरस न करता आयताकृती पद्धतीने करावी, म्हणजे एकीकडून अतिकमी अंतर ठेवावे तर दुसरीकडून सर्वसाधारण अंतर ठेवावे. यात दक्षिणोत्तर ओळी झाल्यास दिवसभर झाडांना उन्हाचा चांगला फायदा होतो. आंबा लागवडीसाठी साधारणतः बाय बाय मीटरचा खड्डा खोदून भरून घेणे आवश्यक असते. मात्र अतिघन लागवडीत दोन झाडांतील अंतर अतिशय कमी असल्याने जेसीबी यंत्राने एक मीटर रुंद व एक मीटर खोल नाली खोदून घ्यावी. जमीन हलकी असेल तर ६० टक्के गाळ आणि ४० टक्के नालीतरील मुरमाड माती अशा मिश्रणाने भरून घ्यावी.  नाली भरताना जेथे कलाम लावायचे आहे, त्या ठिकाणी दोन टोपले शेणखत एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शिफारशीत कीडनाशक पावडर मिसळून भरून घ्यावा. लागवड ठिकाणी कलमाची पिशवबी बसेल असा लहानसा खड्डा खणावा. त्यामध्ये ५०० ग्रॅम लिंबोळी पेंड, २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा, २५ ग्रॅम ऍझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक मिसळून कलाम लागवड करावी. गरम हवेपासून बाग व फळांचे संरक्षण करण्यासाठी बागेभोवती सुरु, महागनी या उंच वाढणाऱ्या वाराप्रतिबंधक वृक्षाची लागवड करावी. अतिघन लागवड केलेल्या बागेत दरवर्षी कलमाखालील संपूर्ण सावलीत उसाचे पाचट, वाळलेले   गवतसाळीचे  तणसाचे आच्छादन करावे. आच्छादन करताना त्यात शिफारशीत कीडनाशक पावडर धुराळवी.जेणेंकरून वाळवीचा त्रास होणार नाही सेंद्रिय पदार्थ नसल्यास प्लास्टिकचे आच्छादन करावे. फळधारणा सुरु झाल्यानंतर दरवर्षी बागेत शास्त्रीय पद्धतीने चटणी करावी. छाटलेल्या झाडावर बोडो पेस्ट लावावी. नवी पालवी येत असताना पावसाळा सुरु होतो. त्यामुळे पानावर करपा रोग किंवा पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. यासोबतच त्यांनी आंबा काढणी पश्चात तंत्रज्ञान, आंबा निर्यात मानके व नियोजन तसेच आंबा पिकातील कल्टारचा वापर, कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी केले तसेच केव्हीके मार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध विस्तार कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. मा.डॉ.संजूला भावर यांनी आंबा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले व आंबा उत्पादकांनी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा असे सांगतिले. शेतकरी उत्पादक कंपनीसाठी बायोमास आधारित कोल्ड स्टोरेज तंत्रज्ञान या विषयावर मा.श्री.पांडुरंग भगत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. 

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मा.श्री.हेमंत जगताप यांनी केले. या कार्यक्रमात महाराष्ट्र भरातून २५० पेक्षा जास्त शेतकरी बंधू भगिनींनी सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम फारच उपयुक्त ठरला असून यातून मिळालेल्या सराव माहितीचा आंबा लागवड, बाग व्यवस्थापन आणि उत्तम आंबा उत्पादनासाठी आम्हाला फायदा होणार असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केव्हीकेतील कर्मचारी श्री.किशोर शेरे, श्री.सतीश कदम, श्री.शिवा काजळे, श्री.जयदेव सिंगल, श्री.जयदीप बनसोडे, श्री.विशाल दाभाडे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


आंबा लागवड तंत्रज्ञान संपूर्ण मार्गदर्शन प्ले लिस्ट लिंक

https://www.youtube.com/playlist?list=PLT33DaT5iw5fgHlU0J-dUYLTvoRIzl1Zu
















****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/






केव्हीके,छत्रपती संभाजीनगर-१ येथे मधुमक्षिका पालन व कृषीमाल निर्यात बाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 


केव्हीके,छत्रपती संभाजीनगर-१ येथे मधुमक्षिका पालन व कृषीमाल निर्यात बाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

दिनांक १६ जुलै, २०२५ रोजी कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली स्थापना दिवसानिमित्त केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA), इंडियन नचरल हनीबीज, पुणे, स्वरदर्शन सांस्कृतिक व सामाजिक संस्था (ग्रामोदय प्रकल्प) वाळूज, छत्रपती संभाजीनगर आणि कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमक्षिका पालन प्रशिक्षण, सर्प दिन आणि ताज्या फळे, भाजीपाला व त्यांचे प्रक्रिया उत्पादने यांच्या निर्यातीसंदर्भात क्षमतावर्धन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर चे खासदार मा.डॉ.भागावतजी कराड यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमासाठी मा.श्रीमती. सुवर्णा माने, उप वन संरक्षक, वन विभाग, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.संजय मारणे, सहायक वन संरक्षक (सेवा निवृत्त) वन विभाग पुणे तथा इंडियन नचरल हनीबीज, पुणे, मा.श्री.अविनाश गायकवाड, श्रीमती ज्योती गायकवाड, स्वरदर्शन सांस्कृतिक व सामाजिक संस्था (ग्रामोदय प्रकल्प) वाळूज, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.शिवाजी  दहिवाल, जिल्हा प्रभारी, पतंजली छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.किशोर पाठक, मानद वन्यजीव रक्षक, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.राहुल काळे, कनिष्ठ कार्यकारी, केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, केव्हीके येथील विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.संजूला भावर, डॉ.बस्वराज पिसुरे, श्री.अशोक निर्वळ यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी सर्व्ह शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी मारदर्शन करताना मा.खा.डॉ.भागवतजी कराड म्हणाले की, जागतिक सर्प दिन असल्यामुळे सापांच्या जनजागृती बद्दल हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे हा फारच उल्लेखनीय असून असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करणे आवश्यक आहे. साप आणि मधुमक्षिका हे दोन्ही जीव निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक असून या विषयावरून जास्तीत जास्त जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे ही आजची गरज आहे. या दोन्हींच्या संरक्षणामुळे आपल्या निसर्गाचा समतोल राखण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार यांच्यामार्फत देखील विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. या सर्व योजनांची लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा. तसेच मशुमक्षिका पालन सारळे उद्योग उभारणीसाठी शासन सदैव आपल्या पाठीशी राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना मा.सुवर्णा माने म्हणाल्या की, आज जागतिक सर्प दिवस आहे त्यामुळे सापांची ओळख आणि सापांचे आपल्या इकोसिस्टीम मधील महत्त्व याबद्दल जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे सोबतच मधमाशी आणि साप याकडे सर्वसामान्य रित्या दुर्लक्ष केले जाते यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे त्यामुळे इकोसिस्टीम जिवंत ठेवण्यासाठी मधमाशी आणि साप या दोन्ही वन्य प्राण्यांचे संरक्षण करणे ही आजच्या काळाची गरज आहे वन्य प्राण्यांपासून पिकांना नुकसान होत आहे हे बाब खरी असली तरी पृथ्वीवर फक्त आपलाच हक्क नसून सर्वच घटकांचा समान हक्क आहे त्यामुळे सर्वच जीवांना जगण्याचा हक्क असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाचे सह आयोजक मा.श्री.संजय मारणे यांनी इंडियन नॅचरल हनीबीज आणि वन विभागामार्फत मधुमक्षिका पालनासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आणि मधुमक्षिका पालन ही काळाची गरज असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी मधुमक्षिका पालनासाठी पुढे येऊन हा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये करावा असे त्यांनी सांगितले. यासोबतच जिल्ह्यातील विविध यंत्रणांमार्फत देखील अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे ज्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना मधुमक्षिका पालना बाबत अधिक माहिती होऊन शेतकरी बांधव मधुमक्षिका पालनाकडे वळतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मराठवाड्यात आढळणारे साप ओळख, समज, गैरसमज आणि काळजी या विषयावर मार्गदर्शन करताना मा.डॉ.किशोर पाठक यांनी सांगितले की, सापाबद्दल आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज असल्यामुळे सापांकडे आपण वेगळ्या नजरेने पाहतो व साप समोर आला की आपण सुरुवातीला त्याला मारण्याबद्दल विचार करतो तर असे न करता तो साप विषारी आहे बिनविषारी आहे याबद्दल सर्वांनी माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. आपण सापांना संरक्षण देण्याचे काम केले पाहिजे. पर्यावरणाच्या अन्नसाखळी मधील साप हा फार महत्वपूर्ण घटक असून सापांबद्दलचे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. या सोबतच सर्पदंश झाल्यानंतर आपल्या समाजामध्ये बऱ्याच गावठी उपायांचा वापर केला जातो. तर त्यांचा वापर न करता दवाखान्यांमध्ये जाऊन योग्य ती अँटीबायोटिक लस अँटी स्नेक लस ही शेतकरी बांधवांनी घेतली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


यावेळी मार्गदर्शन करताना मा.डॉ.दीप्ती पाटगावकर यांनी कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजी नगर येथे असलेल्या विविध सुविधांची माहिती दिली यासोबतच शेतकरी बांधव कृषी उद्योजक कृषी कार्यकर्ते यांच्यासाठी राबवत असलेल्या विविध विस्तार उपक्रमांची माहिती दिली आणि सर्व शेतकरी बांधवांनी या विविध विस्तार कार्यक्रमांचा या विविध विस्तार उपक्रमांचा उपयोग करून घ्यावा अशी ही त्यांनी आवाहन यावेळी केले यासोबतच कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजी नगर येथे उपलब्ध असलेल्या बायोमिक्स बायो फर्टीलायझर तसेच इतर निविष्ठांबद्दल ही त्यांनी शेतकरी बांधवांना माहिती दिली.

यावेळी शास्त्रीय मधुमक्षिका पालन या विषयावर मार्गदर्शन करताना मा.श्री राहुल काळे म्हणाले की, सर्व पृथ्वीवरील समतोल राखण्यामध्ये मधुमक्षिकाचा महत्त्वाचा वाटा असून शेतीतील उत्पादन वाढीसाठी तसेच जीवन चक्र सुरू ठेवण्यासाठी मधुमक्षिका ही फार महत्त्वाची आहे. त्यामुळे मधुमक्षीकाचे संवर्धन करणे आणि मधुमक्षिकाची शेती करणे हे फार फायद्याचे ठरते. शेतकरी बांधवांनी मधुमक्षिका पालन हा एक चांगला उद्योग म्हणून उभारला पाहिजे आणि मधुमक्षिका पालनाचा जर आपण व्यवसाय केला तर शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. त्यामुळे केवळ शेतीवरच अवलंबून न राहता मधुमक्षिका पालनासारखा उद्योग आपण सुरू केला तर त्याचा फायदा आर्थिक दृष्ट्या तर होतोच त्यासोबतच आपल्या पिकातील फळधारणा, फुलधारणा होण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो.

अपेडा प्रादेशिक कार्यालय, मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक मा.श्री.पांडुरंग ए. बामणे यांनी अपेडा ची कार्यपद्धती, अन्न निर्यात क्षेत्रातील योगदान, विविध योजना, GAP प्रमाणनाची प्रक्रिया आणि अपेडा सदस्य नोंदणी याविषयी तपशीलवार माहिती दिली. शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संस्था यांना चांगल्या शेती पद्धती (GAP), तसेच GAP आणि ISO प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्ता नियंत्रण व पॅकेजिंग मानक याबाबत सखोल याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी नैसर्गिक शेती या विषयावर मार्गदर्शन करताना मा.डॉ.अनिता जिंतूरकर यांनी नैसर्गिक शेती म्हणजे काय, नैसर्गिक शेतीचे आधारस्तंभ, नैसर्गिक शेतीचे मूलतत्वे, तसेच नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या निविष्ठा जसे की बिजामृत, जीवामृत इत्यादी ची निर्मिती बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यासोबतच त्या म्हणाला की, नैसर्गिक शेतीसाठी पशुधन हे फार महत्त्वाचे आहे. पशुधनाच्या संगोपणाशिवाय नैसर्गिक शेती करणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीकडे जर आपल्याला जायचं असेल तर पशुधनाचे संगोपन करणे आवश्यक आहे.

कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ.संजूला भावर यांनी फळमाशीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत, तसेच फळे व भाजीपाल्यावर योग्य फवारणी व संरक्षणासाठी लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी सेंद्रिय कीड नियंत्रण, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर व गुणवत्ता राखण्याचे उपाय यावरही महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात निर्यातदारांनी आपला निर्यात अनुभव उपस्थितांसमोर मांडला. तसेच एफपीओ चे प्रतिनिधी श्री.बाळासाहेब पाटील यांनी निर्यात प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याविषयी अनुभव सांगितले.

शेतकरी, एफपीओ प्रतिनिधी व इतर अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद होता. हा कार्यक्रम शेतकरी बांधवांसाठी फार उपयुक्त ठरला असून, अशा कार्यक्रमाचे आयोजन नियमितपणे करणे आवश्यक आहे असे मत शेतकरी बांधवांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केव्हीकेतील कर्मचारी श्री.किशोर शेरे, श्री.सतीश कदम, श्री.शिवा काजळे, श्री.जयदेव सिंगल, श्री.जयदीप बनसोडे, श्री.विशाल दाभाडे व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





























****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/

मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...