Tuesday, February 25, 2025

पीएम किसान सम्मान निधी चा १९ वा हफ्ता लोकार्पण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रम संपन्न

पीएम किसान सम्मान निधी चा १९ वा हफ्ता लोकार्पण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण निमित्त शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न 

पीएम किसान सम्मान निधी चा १९ वा हफ्ता लोकार्पण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण निमित्त शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक २४.०२.२०२५ ऐवजी कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासात मा.श्री.प्रकाश देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.संतोष मुंडे, जिल्हा प्रतिनिधी, ऍग्रोवन, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्यासह कृषी विभागातील विविध अधिकारी, कृषि महाविद्यालय, कांचनवाडी येथील प्राध्यापक व विद्यार्थी आणि शेतकरी बंधू भगिनींनी उपस्थिती होती.











Monday, February 17, 2025

२३ वी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक संपन्न



शेतकरी केंद्रित संशोधन, विस्तार आणि विकास कार्यक्रम हवा - मा.डॉ. इन्द्र मणि


२३ वी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक संपन्न


           वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी २३ वी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू मा.डॉ. इन्द्र मणि यांची ऑनलाईन उपस्थिती होती. तसेच मा.डॉ.गिरधारी वाघमारे, संचालक विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, मा.श्री.प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, एनएआरपी, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री. प्रकाश पाटील, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.मंगेश केदार, व्यवस्थापक, लीड बँक, छत्रपती संभाजीनगर, मा.श्रीमती.कीर्ती जमदाडे, विभागीय वनविकास अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.पंडित मुंडे, प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, संभाजीनगर, मा.श्री.मनीषा हराळ, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा.श्रीमती.पवार, सहाय्यक मत्स्यविकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.चंदनसिंग राठोड, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सोबतच वैज्ञानिक सल्लागार समिती बैठकीचे सदस्य प्रगतशील शेतकरी मा.श्री.जगन्नाथ तायडे, मा.श्रीमती. सुनंदा क्षीरसागर, मा.श्रीमती.शारदा कागदे, मा.श्री.कय्युम शेख, मा.श्रीमती.छाया साबदे यांची देखील उपस्थिती होती.

          यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मा.डॉ. इन्द्र मणि म्हणाले कि, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व जिल्ह्यातील सर्वच कृषी संलग्नित विभागांनी शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवून शेतकरी केंद्रित संशोधन, विस्तार व विकास कार्य करावे. जिल्ह्यातील सर्व विभागांनी एकाच व्यासपीठावर येऊन प्रत्याभरण देऊन शेतकऱ्यांसाठी नियोजन करण्यासाठी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक आवश्यक आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या गोदावरी सारख्या इतरही चांगल्या वाणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येत आहे. अशाच हवामानाशी सुसंगत वाण विकसित करण्यास विद्यापीठामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.  विद्यापीठा मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध विस्तार कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे.

        यावेळी मार्गदर्शन करताना मा.डॉ. गिरिधारी वाघमारे म्हणाले की, बैठकीमध्ये देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे अवलोकन करून त्यानुसार पुढील कार्य अहवाल तयार करावा. तसेच सर्व विभागांसोबत प्रभावीपणे विस्तार कार्य करावे. शेतकरी बांधवांनी देखील विद्यापीठाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. केव्हीके द्वारे घेण्यात आलेल्या विविध चाचण्यांचे निष्कर्ष इतर शेतकरी बांधवांना सांगावेत व तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात प्रोत्साहित करावे. भविष्यात देखील शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विविध प्रशिक्षण कार्यक्रम व इतर विस्तार कार्यक्रमांचे आयोजन केव्हीके मार्फत करण्यात यावे.

         यावेळी मा.श्री.प्रकाश देशमुख म्हणाले की, कृषी विभागामार्फत विविध योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवल्या जात असून त्याचा फायदा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी करून घ्यावा. कार्यक्रमात मा. डॉ.सुर्यकांत पवार, मा.श्री.मंगेश केदार, मा.श्रीमती.कीर्ती जमदाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

         या कार्यक्रमात केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून केव्हीकेच्या मागील दोन वर्षाच्या विविध विस्तार कार्याच्या अहवालाचे सादरीकरण केले. तसेच केव्हीकेच्या सर्वच विषय विशेषज्ञांनी आपापल्या विभागाच्या कार्याचा अहवाल सादर केला. यावेळी उपस्थित प्रगतशील शेतकरी कृषि उद्योजकांनी प्रत्याभरणे दिली व त्यानुसार सर्व विभागांनी कार्य करावे असे मत व्यक्त केले.

            यावेळी कृषी विज्ञान केंद्राद्वारे प्रशिक्षित मा.श्रीमती. जया साबदे, मा.श्री.विकास लोळगे, मा.श्री.शहादेव ढाकणे, मा.श्री.सदाशिव गीते, मा.श्री.बाळू सोनवणे, मा.श्री.ज्ञानेश्वर गलधर, मा.श्री.मनीषा चव्हाण, मा.श्री.अनिता मोरे, मा.श्री.मूलचंद पवार, मा.श्री.राजेंद्र भवर, मा.श्री.आबासाहेब भवर या प्रगतशील शेतकरी कृषी उद्योजकांचा प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बस्वराज पिसुरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.अनिता जिंतूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केव्हीकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.











Thursday, February 13, 2025

वडवाळी, ता.पैठण येथे कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने कापुस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम संपन्न

वडवाळी, ता.पैठण येथे कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने कापुस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम संपन्न

केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या  विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत दि.१३.०२.२०२५ मौजे वडवाळी  येथे प्रगतशील शेतकरी श्री लक्ष्मण बडे यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ च्यां कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी शेतीतुन शाश्वत उत्पादन घेण्यासाठी मातीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक शेतकरी बांधवांनी माती परिक्षण करावे व त्यानुसार पिक लागवडीचे नियोजन करावे. तसेच. दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये योग्य अंतर आणि संतुलित खतांचा वापर करणे या बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. यामध्ये त्यांनी ४०-४५ दिवसांनी गळफांदी काढणे व ८०-९०  दिवसांनी शेंडा खुडणे ही महत्त्वाची कामे आहेत. तसेच कापसाची लागवड ही ९० × ३० सेंटिमीटर या अंतरावर करावी. या पद्धतीने झाडांची एकरी संख्या वाढून उत्पन्न वाढते. कपाशी वेचणीनंतर अनेक शेतकरी फरदड घेतात, ते घेऊ नका त्याऐवजी पऱ्हाटीची कुट्टी करा त्यातुन चांगले सेंद्रिय खतच मिळते परिणामी जमिनीचा पोत सुधारतो असे डॉ. दिप्ती पाटगांवकर यांनी सांगितले. 

तसेच कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) डॉ. संजुला भावर यांनी सांगितले की, मोसंबी बागेतील एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन यांबद्दल मार्गदर्शन केले. बहुतांशी बागेचे वय वाढल्यामुळे उत्पादकता कमी होत आहे. अशा बागेमधील वाळलेल्या रोगट आडव्या तिडव्या वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्याची फळ काढणीनंतर छाटणी करुन झाडाचे पुनरज्जीवन केल्यास नवीन फुटीवर चांगली फळधारणा होण्यास मदत होते. छाटणी नंतर कट केलेल्या भागावर बोर्डोपेस्टचा लेप दिल्यास बुरशीजन्य रोगापासून झाडांचा बचाव देखील होतो.

यावेळी मंडळ अधिकारी श्री. आर.एस. सरोदे, कृषि सहाय्यक श्रीमती आर. डी. पवार, श्री वाय.एन. चौधरी वडवाळी गावचे सरपंच श्री किशोर काळे तसेच या विशेष कापूस प्रकल्पांचे तांत्रिक प्रशिक्षक श्री सतिश कदम, श्री जयदेवसिंग सिंगल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. वडवाळी गावातील शेतकरी बांधव व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Saturday, February 1, 2025

१०७ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

 

१०७ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

               वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने १०७ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम दिनांक ०१ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर यांची उपस्थिती होती. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर येथी सहयोगी प्राध्यापक डॉ.दिलीप हिंगोले, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथील विषय विशेषज्ञ डॉ.संजूला भावर तसेच विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.अनिता जिंतूरकर, प्रगतशील शेतकरी श्री.गंगाराम तायडे यांची उपस्थिती होती.
              यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ.दिप्ती पाटगावकर म्हणाल्या की, केव्हीके द्वारे शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येतो तरी या कार्यक्रमासाठी शेतकरी बांधवानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा. तसेच शेतीतील विविध तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी केव्हीकेला संपर्क करावा. 
              यावेळी टरबूज व खरबूज पीक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.संजूला भावर म्हणाले की, टरबूज व खरबूज लागवडीसाठी दर्जेदार रोपे घेणे किंवा स्वतः रोप निर्मिती करून त्यांची लागवड करणे आवश्यक आहे. दोन वाफ्यातील अंतर पाच ते सहा फूट तर दोन रोपांतील अंतर एक ते दोन फूट ठेवावे. टरबूजच्या अरका माणिक, दुर्गापूर केशर, पुसा बेदाणा, शुगर बेबी, अर्का मधू इत्यादी जाती एकदम चांगल्या आहेत. त्याची टिकवण क्षमता जास्त आहे. खरबूज साठी कुंदन, बॉबी, अर्का गजन, हरा मधू इत्यादी जातींची निवड करावी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा. तसेच या दोन्ही पिकांमध्ये क्रॉप कव्हर (पीक आच्छादन) चा वापर करणे फार उपयुक्त आहे. यामुळे पहिल्या तीस दिवसांपर्यंत किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास फायदा होतो. यामुळे फवारणी वरील खर्च देखील कमी होतो. तसेच पोषक वातावरण निर्मितीमुळे अधिक व लवकर उत्पादन घेणे शक्य होते.  तसेच क्रॉप कव्हर चा वापर काळजीपूर्वक केला त्याचा वापर तर दोन-तीन वर्षापर्यंत करता येतो. अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना दीड बॅग डीएपी आणि एक बॅग एमओपी ची मात्रा लागवड करताना द्यावी. कॅल्शिअम नायट्रेट, बोरॉन यांची देखील फवारणी घेणे या दोन्ही पिकात फार महत्वाचे आहे. वनस्पती वाढ संप्रेकाचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने घावे. टरबूज मध्ये टिबा तर खरबूज मध्ये ईथरेल या संप्रेरकांची फवारणी घ्यावी. ज्यामुळे मादी फुलांची संख्या वाढून फळधारणा चांगली होते व उत्पादनात वाढ होते. तसेच फळमाशीच्या नियंत्रणासाठी फळमाशीचे सापळे लावणे आवश्यक आहे.
            यावेळी रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.दिलीप हिंगोले म्हणाले की, रोग नियंत्रणासाठी यजमान पीक, वातावरण इत्यादी घटकांचा विचार करणे फार महत्वाचे आहेत. मोसंबी मध्ये डिंक्या हा रोपवाटिकेतील नियोजनाच्या अभावामुळे देखील होऊ शकतो. तसेच रोपावस्टेट मर, मूळकूज देखील होतो त्यावेळी मेटालेक्झील, कॅप्टन इत्यादि बुरशीनाशकाची तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी. जलद ऱ्हास (ट्रीस्टीजा व्हायरस) यांचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो. खैऱ्या रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन व कॉपर ऑक्सिक्लोराईड यांचा वापर करावा. डिंक्याच्या नियंत्रणासाठी ज्या भागाला प्रादुर्भाव झालेला आहे तेवढाच भाग काढणे आवश्यक आहे. तो भाग काढून घेतल्यानंतर तो भाग मर्क्युरिक क्लोराइड ने पुसून घेऊन त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावे. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने बुरशीनाशकांचा वापर करावा. ग्रीनिंग च्या नियंत्रणासाठी झिंक सल्फेट व फेरस सल्फेट झाडाभोवती आळ्यात द्यावे. मोसंबीमध्ये बोर्डो पेस्टचा वापर सर्वच शेतकरी बांधवांनी नियमितपणे करणे आवश्यक आहे. डाळिंबामध्ये पीक होल बोरर आणि तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. छाटणी केल्यानंतर बोर्डोपेस्ट लावणे आवश्यक आहे. अँटिबायोटिक चा वापर वारंवार करू नये. आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने अँटीबायोटिकचा वापर करावा. बागेमध्ये अतिरिक्त आर्द्रता होणे हानिकारक ठरते आणि यामुळे रोगांच्या वाढीला पोषक वातावरण तयार होते. हरभऱ्यातील मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स चा वापर करणे फायदेशीर आहे. कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकांची आळवणी करणे प्रभावी दिसून आले आहे. ओली कुज आणि कोरडी कुज देखील हरभऱ्यात दिसून येते. यांच्या नियंत्रणासाठी पिकांची फेरपालट करणे, जमिनीची मशागत चांगली करणे आणि बायोमिक्स किंवा इतर जैविक बुरशीनाशकांचा वापर करणे या पद्धतींचा वापर करावा.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री.जयदेव सिंगल, श्री.जयदीप बनसोडे यांनी केले.








मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...