Saturday, February 1, 2025

१०७ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

 

१०७ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

               वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने १०७ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम दिनांक ०१ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर यांची उपस्थिती होती. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर येथी सहयोगी प्राध्यापक डॉ.दिलीप हिंगोले, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथील विषय विशेषज्ञ डॉ.संजूला भावर तसेच विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.अनिता जिंतूरकर, प्रगतशील शेतकरी श्री.गंगाराम तायडे यांची उपस्थिती होती.
              यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ.दिप्ती पाटगावकर म्हणाल्या की, केव्हीके द्वारे शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येतो तरी या कार्यक्रमासाठी शेतकरी बांधवानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा. तसेच शेतीतील विविध तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी केव्हीकेला संपर्क करावा. 
              यावेळी टरबूज व खरबूज पीक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.संजूला भावर म्हणाले की, टरबूज व खरबूज लागवडीसाठी दर्जेदार रोपे घेणे किंवा स्वतः रोप निर्मिती करून त्यांची लागवड करणे आवश्यक आहे. दोन वाफ्यातील अंतर पाच ते सहा फूट तर दोन रोपांतील अंतर एक ते दोन फूट ठेवावे. टरबूजच्या अरका माणिक, दुर्गापूर केशर, पुसा बेदाणा, शुगर बेबी, अर्का मधू इत्यादी जाती एकदम चांगल्या आहेत. त्याची टिकवण क्षमता जास्त आहे. खरबूज साठी कुंदन, बॉबी, अर्का गजन, हरा मधू इत्यादी जातींची निवड करावी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा. तसेच या दोन्ही पिकांमध्ये क्रॉप कव्हर (पीक आच्छादन) चा वापर करणे फार उपयुक्त आहे. यामुळे पहिल्या तीस दिवसांपर्यंत किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास फायदा होतो. यामुळे फवारणी वरील खर्च देखील कमी होतो. तसेच पोषक वातावरण निर्मितीमुळे अधिक व लवकर उत्पादन घेणे शक्य होते.  तसेच क्रॉप कव्हर चा वापर काळजीपूर्वक केला त्याचा वापर तर दोन-तीन वर्षापर्यंत करता येतो. अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना दीड बॅग डीएपी आणि एक बॅग एमओपी ची मात्रा लागवड करताना द्यावी. कॅल्शिअम नायट्रेट, बोरॉन यांची देखील फवारणी घेणे या दोन्ही पिकात फार महत्वाचे आहे. वनस्पती वाढ संप्रेकाचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने घावे. टरबूज मध्ये टिबा तर खरबूज मध्ये ईथरेल या संप्रेरकांची फवारणी घ्यावी. ज्यामुळे मादी फुलांची संख्या वाढून फळधारणा चांगली होते व उत्पादनात वाढ होते. तसेच फळमाशीच्या नियंत्रणासाठी फळमाशीचे सापळे लावणे आवश्यक आहे.
            यावेळी रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.दिलीप हिंगोले म्हणाले की, रोग नियंत्रणासाठी यजमान पीक, वातावरण इत्यादी घटकांचा विचार करणे फार महत्वाचे आहेत. मोसंबी मध्ये डिंक्या हा रोपवाटिकेतील नियोजनाच्या अभावामुळे देखील होऊ शकतो. तसेच रोपावस्टेट मर, मूळकूज देखील होतो त्यावेळी मेटालेक्झील, कॅप्टन इत्यादि बुरशीनाशकाची तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी. जलद ऱ्हास (ट्रीस्टीजा व्हायरस) यांचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो. खैऱ्या रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन व कॉपर ऑक्सिक्लोराईड यांचा वापर करावा. डिंक्याच्या नियंत्रणासाठी ज्या भागाला प्रादुर्भाव झालेला आहे तेवढाच भाग काढणे आवश्यक आहे. तो भाग काढून घेतल्यानंतर तो भाग मर्क्युरिक क्लोराइड ने पुसून घेऊन त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावे. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने बुरशीनाशकांचा वापर करावा. ग्रीनिंग च्या नियंत्रणासाठी झिंक सल्फेट व फेरस सल्फेट झाडाभोवती आळ्यात द्यावे. मोसंबीमध्ये बोर्डो पेस्टचा वापर सर्वच शेतकरी बांधवांनी नियमितपणे करणे आवश्यक आहे. डाळिंबामध्ये पीक होल बोरर आणि तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. छाटणी केल्यानंतर बोर्डोपेस्ट लावणे आवश्यक आहे. अँटिबायोटिक चा वापर वारंवार करू नये. आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने अँटीबायोटिकचा वापर करावा. बागेमध्ये अतिरिक्त आर्द्रता होणे हानिकारक ठरते आणि यामुळे रोगांच्या वाढीला पोषक वातावरण तयार होते. हरभऱ्यातील मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स चा वापर करणे फायदेशीर आहे. कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकांची आळवणी करणे प्रभावी दिसून आले आहे. ओली कुज आणि कोरडी कुज देखील हरभऱ्यात दिसून येते. यांच्या नियंत्रणासाठी पिकांची फेरपालट करणे, जमिनीची मशागत चांगली करणे आणि बायोमिक्स किंवा इतर जैविक बुरशीनाशकांचा वापर करणे या पद्धतींचा वापर करावा.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री.जयदेव सिंगल, श्री.जयदीप बनसोडे यांनी केले.








No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...