Friday, July 18, 2025

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर-१ येथे मधुमक्षिका पालन व कृषीमाल निर्यात बाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 


केव्हीके,छत्रपती संभाजीनगर-१ येथे मधुमक्षिका पालन व कृषीमाल निर्यात बाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

दिनांक १६ जुलै, २०२५ रोजी कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली स्थापना दिवसानिमित्त केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA), इंडियन नचरल हनीबीज, पुणे, स्वरदर्शन सांस्कृतिक व सामाजिक संस्था (ग्रामोदय प्रकल्प) वाळूज, छत्रपती संभाजीनगर आणि कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमक्षिका पालन प्रशिक्षण, सर्प दिन आणि ताज्या फळे, भाजीपाला व त्यांचे प्रक्रिया उत्पादने यांच्या निर्यातीसंदर्भात क्षमतावर्धन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर चे खासदार मा.डॉ.भागावतजी कराड यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमासाठी मा.श्रीमती. सुवर्णा माने, उप वन संरक्षक, वन विभाग, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.संजय मारणे, सहायक वन संरक्षक (सेवा निवृत्त) वन विभाग पुणे तथा इंडियन नचरल हनीबीज, पुणे, मा.श्री.अविनाश गायकवाड, श्रीमती ज्योती गायकवाड, स्वरदर्शन सांस्कृतिक व सामाजिक संस्था (ग्रामोदय प्रकल्प) वाळूज, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.शिवाजी  दहिवाल, जिल्हा प्रभारी, पतंजली छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.किशोर पाठक, मानद वन्यजीव रक्षक, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.राहुल काळे, कनिष्ठ कार्यकारी, केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, केव्हीके येथील विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.संजूला भावर, डॉ.बस्वराज पिसुरे, श्री.अशोक निर्वळ यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी सर्व्ह शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी मारदर्शन करताना मा.खा.डॉ.भागवतजी कराड म्हणाले की, जागतिक सर्प दिन असल्यामुळे सापांच्या जनजागृती बद्दल हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे हा फारच उल्लेखनीय असून असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करणे आवश्यक आहे. साप आणि मधुमक्षिका हे दोन्ही जीव निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक असून या विषयावरून जास्तीत जास्त जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे ही आजची गरज आहे. या दोन्हींच्या संरक्षणामुळे आपल्या निसर्गाचा समतोल राखण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार यांच्यामार्फत देखील विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. या सर्व योजनांची लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा. तसेच मशुमक्षिका पालन सारळे उद्योग उभारणीसाठी शासन सदैव आपल्या पाठीशी राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना मा.सुवर्णा माने म्हणाल्या की, आज जागतिक सर्प दिवस आहे त्यामुळे सापांची ओळख आणि सापांचे आपल्या इकोसिस्टीम मधील महत्त्व याबद्दल जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे सोबतच मधमाशी आणि साप याकडे सर्वसामान्य रित्या दुर्लक्ष केले जाते यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे त्यामुळे इकोसिस्टीम जिवंत ठेवण्यासाठी मधमाशी आणि साप या दोन्ही वन्य प्राण्यांचे संरक्षण करणे ही आजच्या काळाची गरज आहे वन्य प्राण्यांपासून पिकांना नुकसान होत आहे हे बाब खरी असली तरी पृथ्वीवर फक्त आपलाच हक्क नसून सर्वच घटकांचा समान हक्क आहे त्यामुळे सर्वच जीवांना जगण्याचा हक्क असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाचे सह आयोजक मा.श्री.संजय मारणे यांनी इंडियन नॅचरल हनीबीज आणि वन विभागामार्फत मधुमक्षिका पालनासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आणि मधुमक्षिका पालन ही काळाची गरज असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी मधुमक्षिका पालनासाठी पुढे येऊन हा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये करावा असे त्यांनी सांगितले. यासोबतच जिल्ह्यातील विविध यंत्रणांमार्फत देखील अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे ज्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना मधुमक्षिका पालना बाबत अधिक माहिती होऊन शेतकरी बांधव मधुमक्षिका पालनाकडे वळतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मराठवाड्यात आढळणारे साप ओळख, समज, गैरसमज आणि काळजी या विषयावर मार्गदर्शन करताना मा.डॉ.किशोर पाठक यांनी सांगितले की, सापाबद्दल आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज असल्यामुळे सापांकडे आपण वेगळ्या नजरेने पाहतो व साप समोर आला की आपण सुरुवातीला त्याला मारण्याबद्दल विचार करतो तर असे न करता तो साप विषारी आहे बिनविषारी आहे याबद्दल सर्वांनी माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. आपण सापांना संरक्षण देण्याचे काम केले पाहिजे. पर्यावरणाच्या अन्नसाखळी मधील साप हा फार महत्वपूर्ण घटक असून सापांबद्दलचे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. या सोबतच सर्पदंश झाल्यानंतर आपल्या समाजामध्ये बऱ्याच गावठी उपायांचा वापर केला जातो. तर त्यांचा वापर न करता दवाखान्यांमध्ये जाऊन योग्य ती अँटीबायोटिक लस अँटी स्नेक लस ही शेतकरी बांधवांनी घेतली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


यावेळी मार्गदर्शन करताना मा.डॉ.दीप्ती पाटगावकर यांनी कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजी नगर येथे असलेल्या विविध सुविधांची माहिती दिली यासोबतच शेतकरी बांधव कृषी उद्योजक कृषी कार्यकर्ते यांच्यासाठी राबवत असलेल्या विविध विस्तार उपक्रमांची माहिती दिली आणि सर्व शेतकरी बांधवांनी या विविध विस्तार कार्यक्रमांचा या विविध विस्तार उपक्रमांचा उपयोग करून घ्यावा अशी ही त्यांनी आवाहन यावेळी केले यासोबतच कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजी नगर येथे उपलब्ध असलेल्या बायोमिक्स बायो फर्टीलायझर तसेच इतर निविष्ठांबद्दल ही त्यांनी शेतकरी बांधवांना माहिती दिली.

यावेळी शास्त्रीय मधुमक्षिका पालन या विषयावर मार्गदर्शन करताना मा.श्री राहुल काळे म्हणाले की, सर्व पृथ्वीवरील समतोल राखण्यामध्ये मधुमक्षिकाचा महत्त्वाचा वाटा असून शेतीतील उत्पादन वाढीसाठी तसेच जीवन चक्र सुरू ठेवण्यासाठी मधुमक्षिका ही फार महत्त्वाची आहे. त्यामुळे मधुमक्षीकाचे संवर्धन करणे आणि मधुमक्षिकाची शेती करणे हे फार फायद्याचे ठरते. शेतकरी बांधवांनी मधुमक्षिका पालन हा एक चांगला उद्योग म्हणून उभारला पाहिजे आणि मधुमक्षिका पालनाचा जर आपण व्यवसाय केला तर शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. त्यामुळे केवळ शेतीवरच अवलंबून न राहता मधुमक्षिका पालनासारखा उद्योग आपण सुरू केला तर त्याचा फायदा आर्थिक दृष्ट्या तर होतोच त्यासोबतच आपल्या पिकातील फळधारणा, फुलधारणा होण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो.

अपेडा प्रादेशिक कार्यालय, मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक मा.श्री.पांडुरंग ए. बामणे यांनी अपेडा ची कार्यपद्धती, अन्न निर्यात क्षेत्रातील योगदान, विविध योजना, GAP प्रमाणनाची प्रक्रिया आणि अपेडा सदस्य नोंदणी याविषयी तपशीलवार माहिती दिली. शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संस्था यांना चांगल्या शेती पद्धती (GAP), तसेच GAP आणि ISO प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्ता नियंत्रण व पॅकेजिंग मानक याबाबत सखोल याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी नैसर्गिक शेती या विषयावर मार्गदर्शन करताना मा.डॉ.अनिता जिंतूरकर यांनी नैसर्गिक शेती म्हणजे काय, नैसर्गिक शेतीचे आधारस्तंभ, नैसर्गिक शेतीचे मूलतत्वे, तसेच नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या निविष्ठा जसे की बिजामृत, जीवामृत इत्यादी ची निर्मिती बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यासोबतच त्या म्हणाला की, नैसर्गिक शेतीसाठी पशुधन हे फार महत्त्वाचे आहे. पशुधनाच्या संगोपणाशिवाय नैसर्गिक शेती करणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीकडे जर आपल्याला जायचं असेल तर पशुधनाचे संगोपन करणे आवश्यक आहे.

कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ.संजूला भावर यांनी फळमाशीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत, तसेच फळे व भाजीपाल्यावर योग्य फवारणी व संरक्षणासाठी लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी सेंद्रिय कीड नियंत्रण, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर व गुणवत्ता राखण्याचे उपाय यावरही महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात निर्यातदारांनी आपला निर्यात अनुभव उपस्थितांसमोर मांडला. तसेच एफपीओ चे प्रतिनिधी श्री.बाळासाहेब पाटील यांनी निर्यात प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याविषयी अनुभव सांगितले.

शेतकरी, एफपीओ प्रतिनिधी व इतर अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद होता. हा कार्यक्रम शेतकरी बांधवांसाठी फार उपयुक्त ठरला असून, अशा कार्यक्रमाचे आयोजन नियमितपणे करणे आवश्यक आहे असे मत शेतकरी बांधवांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केव्हीकेतील कर्मचारी श्री.किशोर शेरे, श्री.सतीश कदम, श्री.शिवा काजळे, श्री.जयदेव सिंगल, श्री.जयदीप बनसोडे, श्री.विशाल दाभाडे व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





























****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/

No comments:

Post a Comment

मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट

  मा.डॉ.त्रिलोचन मोहपात्रा व मा.डॉ.इन्द्र मणि यांची केव्हीके ,  छत्रपती संभाजीनगर-१ येथे भेट             वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्या...