आंबा उत्तम कृषि पद्धती एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
शाश्वत आंबा उत्पादन घेण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब करावा
मा.डॉ.इन्द्र मणि
आंबा हे आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख पीक असून त्याबद्दल शास्त्रीय माहिती घेऊन त्याप्रमाणे लागवड करणे आवश्यक आहे. तसेच यातील निर्यात संधी बाबत शेतकरी बांधवांनी जाणून घेऊन उत्तम आंबा उत्पादनावर भर देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आंबा उत्तम कृषि पद्धती प्रशिक्षण कार्यक्रम सर्व शेतकरी बांधवांना फार उपयुक्त ठरणारा असा कार्यक्रम आहे. शेतकरी बाधवांसमोर विविध अडचणी आहेत. त्यामुळे सर्व शास्त्रज्ञ विभाग यांनी शेतकरी देवो भव: या भावनेने कार्य करण्याचा संकल्प करुन कार्य केले तर आपण बऱ्याच अडचणी सोडविण्यात यशस्वी होऊ व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास खुप मोठा फायदा होणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी द्वारे शेतकऱ्यांसाठी विविध विस्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत असून या विविध उपक्रमांची दाखल राष्ट्रीय स्थरावर देखील घेण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या सर्व विस्तार कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केले.
सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहासहाय्यित महाराष्ट्र ॲग्रो बिझनेट नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे, कृषि विभाग, आत्मा, छत्रपती संभाजीनगर व वनामकृवि, परभणी अंतर्गत केव्हीके,पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने केव्हीके, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे दि. १८ जुलै २०२५ रोजी आयोजित “आंबा- उत्तम कृषि पद्धती बाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठ, परभणीचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.डॉ.राकेश अहिरे, संचालक विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा.श्रीमती.अश्विनी पठारे, उपविभागीय कृषि अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.भगवानराव कापसे, आंबा तज्ञ, गटशेतीचे प्रणेते तथा उपाध्यक्ष महाकेशर महासंघ,छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१, मा.श्री.अरुण नादरे, विभागीय प्रकल्प अधिकारी, मॅग्नेट, छत्रपती संभाजीनगर मा.श्री.हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, एमसीडीसी, पुणे, केबी एक्सपोर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड चे मा.श्री.लक्ष्मण पाटील, मा.श्री.समीर खिलारे, मॅग्नेट प्रकल्पाचे मा.श्री.मारुती पवार, मा.श्री. राहूल शेळके, कु.निशिगंधा देशमुख, मा.श्री.पांडुरंग भगत, व्यवस्थापक, न्यू लीफ डायनामिक टेकनॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, मा.श्री.सोमनाथ जाधव, व्यवस्थापक, ॲग्री प्लास्ट, पुणे, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर येथील विषय विशेषज्ञ मा.डॉ.संजूला भावर, मा.डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.बस्वराज पिसुरे, प्रा.अशोक निर्वळ यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार बंधू, विविध अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.डॉ.राकेश अहिरे म्हणाले कि, डाळींबाच्या लागवडी खालोखाल आंबा हे प्रमुख पीफळक छत्रपती संभाजीनगर मध्ये घेतले जाते. आंबा हे डाळींब पेक्षा कमी मशागतीचे पीक असून याद्वारे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊन अधिक आर्थिक नफा मिळवू शकतात. आंबा लागवड व निर्यातीस खुप मोठा वाव आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतींचा अभ्यास व अवलंब करावा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या सर्वच कृषि विज्ञान केंद्रांमार्फत अशा कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. याचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घ्यावा. माझा एक दिवा माझ्या बळीराजासाठी, ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम यासारखे अभिनव उपक्रम विद्यापीठा मार्फत आयोजित करण्यात येतात ज्यांचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना मा.डॉ.भगवानराव कापसे म्हणाले कि, आंबा पीक कोरडवाहु असल्याचा समज, चुकीच्या जमिनीची निवड, तंत्रज्ञानाचा अभाव, जास्त अंतरावरील लागवड हि आंब्यातील कमी उत्पादकतेची काही प्रमुख कारणे असून यामध्ये शेतकरी बांधवांनी बदल करणे आवश्यक आहे. घन ते अतिघन लागवड करावयाची असल्यास घेर नियंत्रण हे आलेच. त्यासाठी गरजेप्रमाणे बुटका / खुजा जातीची निवड, वाढ नियंत्रकाचा वापर, योग्य वेळेत योग्य पद्धतीने छाटणी या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. यामुळे सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग होतो, कार्बनडाय जड असल्यामुळे वातावरणात खालच्या थरात जास्त, बाग लवकर फळात येते त्यामुळे उत्तम प्रतीची फळे आणि जास्त उत्पन्न मिळते. अतिघन लागवड करताना लागवड ही औरस - चौरस न करता आयताकृती पद्धतीने करावी, म्हणजे एकीकडून अतिकमी अंतर ठेवावे तर दुसरीकडून सर्वसाधारण अंतर ठेवावे. यात दक्षिणोत्तर ओळी झाल्यास दिवसभर झाडांना उन्हाचा चांगला फायदा होतो. आंबा लागवडीसाठी साधारणतः १ बाय १ बाय १ मीटरचा खड्डा खोदून भरून घेणे आवश्यक असते. मात्र अतिघन लागवडीत दोन झाडांतील अंतर अतिशय कमी असल्याने जेसीबी यंत्राने एक मीटर रुंद व एक मीटर खोल नाली खोदून घ्यावी. जमीन हलकी असेल तर ६० टक्के गाळ आणि ४० टक्के नालीतरील मुरमाड माती अशा मिश्रणाने भरून घ्यावी. नाली भरताना जेथे कलाम लावायचे आहे, त्या ठिकाणी दोन टोपले शेणखत एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शिफारशीत कीडनाशक पावडर मिसळून भरून घ्यावा. लागवड ठिकाणी कलमाची पिशवबी बसेल असा लहानसा खड्डा खणावा. त्यामध्ये ५०० ग्रॅम लिंबोळी पेंड, २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा, २५ ग्रॅम ऍझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक मिसळून कलाम लागवड करावी. गरम हवेपासून बाग व फळांचे संरक्षण करण्यासाठी बागेभोवती सुरु, महागनी या उंच वाढणाऱ्या वाराप्रतिबंधक वृक्षाची लागवड करावी. अतिघन लागवड केलेल्या बागेत दरवर्षी कलमाखालील संपूर्ण सावलीत उसाचे पाचट, वाळलेले गवत, साळीचे तणसाचे आच्छादन करावे. आच्छादन करताना त्यात शिफारशीत कीडनाशक पावडर धुराळवी.जेणेंकरून वाळवीचा त्रास होणार नाही सेंद्रिय पदार्थ नसल्यास प्लास्टिकचे आच्छादन करावे. फळधारणा सुरु झाल्यानंतर दरवर्षी बागेत शास्त्रीय पद्धतीने चटणी करावी. छाटलेल्या झाडावर बोडो पेस्ट लावावी. नवी पालवी येत असताना पावसाळा सुरु होतो. त्यामुळे पानावर करपा रोग किंवा पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. यासोबतच त्यांनी आंबा काढणी पश्चात तंत्रज्ञान, आंबा निर्यात मानके व नियोजन तसेच आंबा पिकातील कल्टारचा वापर, कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी केले तसेच केव्हीके मार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध विस्तार कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. मा.डॉ.संजूला भावर यांनी आंबा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले व आंबा उत्पादकांनी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा असे सांगतिले. शेतकरी उत्पादक कंपनीसाठी बायोमास आधारित कोल्ड स्टोरेज तंत्रज्ञान या विषयावर मा.श्री.पांडुरंग भगत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मा.श्री.हेमंत जगताप यांनी केले. या कार्यक्रमात महाराष्ट्र भरातून २५० पेक्षा जास्त शेतकरी बंधू भगिनींनी सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम फारच उपयुक्त ठरला असून यातून मिळालेल्या सराव माहितीचा आंबा लागवड, बाग व्यवस्थापन आणि उत्तम आंबा उत्पादनासाठी आम्हाला फायदा होणार असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केव्हीकेतील कर्मचारी श्री.किशोर शेरे, श्री.सतीश कदम, श्री.शिवा काजळे, श्री.जयदेव सिंगल, श्री.जयदीप बनसोडे, श्री.विशाल दाभाडे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
आंबा लागवड तंत्रज्ञान संपूर्ण मार्गदर्शन प्ले लिस्ट लिंक
https://www.youtube.com/playlist?list=PLT33DaT5iw5fgHlU0J-dUYLTvoRIzl1Zu
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :













No comments:
Post a Comment