काटेकोर नियोजन केल्यास ऊसाचे उच्च उत्पादन मिळू शकते - मा.डॉ.राकेश अहिरे
८२ वा शेतकरी शास्त्रज्ञ ऑनलाइन सुसंवाद कार्यक्रम संपन्न
विस्तार शिक्षण संचालनालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ जानेवारी, २०२६ रोजी ८२ वा ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी चे माननीय संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.राकेश अहिरे, मा.श्री.सुरेश काळे, मुख्य ऊस विकास अधिकारी, माळेगाव सहकारी साखर कारखाना, बारामती मा.डॉ.प्रशांत देशमुख, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी, वनामकृवि, परभणी, मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ तसेच विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, डॉ.अनिता जिंतूरकर, श्री.अशोक निर्वळ, विविध विभागाचे शास्त्रज्ञ, अधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना मा.डॉ.राकेश अहिरे म्हणाले की, ऊस पिकामध्ये उच्च उत्पादन घेण्यासाठी गुणवत्ता युक्त बेण्याची निवड, योग्य लागवड अंतर, संतुलित पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन या गोष्टी शेतकरी बांधवांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच श्री.काळे यांनी अवलंबलेल्या उच्च ऊस उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल विद्यापीठ स्थरावर देखील अभ्यास केला जाईल.
यावेळी एकरी ४०० टन ऊस उत्पादन या विषयावर मार्गदर्शन करताना मा.श्री.सुरेश काळे म्हणाले की, ऊसाचे उत्पादन वाढण्यासाठी सूर्यप्रकाश एक महत्त्वाचा घटक असून एकरी ४०० टन ऊसाचे उत्पादन मिळू शकते. सूर्यप्रकाश हा ऊस उत्पादन वाढण्यासाठी प्रमुख घटक असल्याचे मत काळे यांनी व्यक्त केले. ऊस पिकासाठी १०० टक्के सूर्यप्रकाश मिळाल्यास एकरी ४०० टन उत्पादन मिळू शकतो, याची कल्पना सुचली. स्टेजिंग करून उसाला पडण्यापासून वाचवले आणि ऊस सरळ उभा राहण्यास मदत झाली तर त्याला जास्तीचा सूर्यप्रकाश मिळून अधिक उत्पादन मिळू शकते. स्वतःच्या १३ गुंठे क्षेत्रावर प्रयोग त्यांनी केला. जेथे पीक घेतले ती जमीन क्षारयुक्त असून, जवळपास १३०० टीडीएस असणारे पाणी अशा क्षेत्रांमध्ये स्टेजिंग पद्धत वापरून ८६०३२ या जातीच्या उसाची लागवड केली. जवळपास एकरी ४०० टन उसाचे उत्पादन मिळू शकते, असे मत श्री.काळे यांनी व्यक्त केले.
मा.श्री.सुरेश काळे यांच्या म्हणण्यानुसार, काही ऊस उत्पादक शेतकरी एकरी १०० टन ऊस उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. तज्ज्ञांच्या मते यासाठी प्रति एकरी ३५ ते ४० हजार उसाची संख्या असावी, तसेच प्रत्येक उसाचे वजन २.५ ते ३ किलो असावे, जेणेकरून प्रतिएकरी १०० टन ऊस उत्पादन मिळते. यासाठी पट्टा पद्धत, ऊस रोपांचा वापर, सेंद्रिय खते, ठिबक सिंचनाचा वापर, वेगवेगळ्या फवारण्या आदींचा उपयोग केल्यास एकरी १०० टन उत्पादन मिळू शकते. परंतु, असा जोपासलेला ऊस ७ ते ८ महिन्यानंतर वाऱ्यामुळे किंवा त्याच्या स्वतःच्या वजनामुळे संपूर्णतः जमीनलगत पडतो. पडलेला ऊस जिवंत राहण्यासाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असते. पडलेल्या उसास खूप प्रयत्न करून जिवंत राहावे लागते यामध्ये उसाची ६० टक्के ऊर्जा वाया जाते. त्यामुळे अशा उसाचे वजन २ ते ३ किलोपेक्षा जास्त मिळणे खूप जिकिरीचे ठरते. हे टाळण्यासाठी स्टेजिंग करावे लागेल. एक वेळेस ऊस लागवड केल्यानंतर कमीत-कमी उसाचे पुढे ५ ते ७ खोडवे पीक घेणे शक्य आहे. उसाला एकदा स्टेजिंग केलेला खर्च पुढे १५ ते २० वर्षापर्यंत करण्याची गरज नाही.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निराकरण तज्ज्ञांद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केले.
****
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :
No comments:
Post a Comment