Saturday, March 1, 2025

१०८ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न


अडचणींना न घाबरता कार्य करत गेल्यास उद्योग उभारणीत नक्कीच यश येते - श्रीमती.छायाताई साबदे

१०८ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र,पैठण रोड,छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत दिनांक ०१ मार्च २०१५ रोजी १०८ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर या होत्या. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी उद्योजिका श्रीमती.छायाताई साबदे, श्री.अशोक निर्वळ, विषय विशेषज्ञ, कृषी हवामानशास्त्र, डॉ.संजूला भावर, विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, डॉ.बस्वराज पिसुरे, विषय विशेषज्ञ, विस्तार शिक्षण यांची उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्ष मार्गदर्शन करताना डॉ.दिप्ती पाटगावकर म्हणाल्या की, कृषी उद्योग उभा करताना अभ्यास आणि प्रशिक्षण असणे गरजेचे आहे. कृषी उद्योग उभारणीसाठी केव्हीके मार्फत नियमित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. आपल्या आसपास अशा बऱ्याच उद्योजिका आहेत ज्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. त्यातूनच त्या पूढे जातील आणि त्यांचा आदर्श इतर शेतकरी बंधू भगिनी घेतील.

कृषी विज्ञान केंद्र मार्फत विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात आणि ज्याद्वारे आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला उद्योजक तयार झालेले आहेत. शेतकरी बंधू-भगिनींना कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण द्यायचे असेल तर कृषी विज्ञान केंद्र आपल्या पाठीशी असून शेतकरी बांधवांनी कृषी विज्ञान केंद्र शी संपर्क करावा.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शक करताना श्रीमती. छायाताई साबदे यांनी त्यांनी स्वतः सुरू केलेल्या त्यांच्या सिद्धी गृह उद्योगाविषयी विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, प्रत्येक उद्योगाची सुरुवात ही शून्यातूनच करावी लागते आणि त्यासाठी आपल्या आसपास असलेल्या सर्व यंत्रणांचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. योग्य मार्गदर्शन आणि आपले योग्य कार्य असेल तर आपण उद्योग हा चांगल्या पद्धतीने उभा करू शकतो. उद्योग उभा करत असताना बऱ्याच अडचणी येतात. अडचणी आल्या तरच आपण त्यातून काहीतरी शिकतो आणि त्या पद्धतीने आपण आपले कार्य हे चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यामुळे अडचणींवर मात करत गेल्यानंतरच यशस्वी उद्योजक घडतो. सर्व शेतकरी बांधवांनी अडचणींना न घाबरता त्यावर मात करून योग्य मार्गदर्शन घेऊन सर्व शासकीय यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली जर उत्तम पद्धतीने कार्य केले तर त्यांना उद्योग चांगल्या पद्धतीने उभा करता येऊ शकतो. उद्योग उभा करण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत तांत्रिक मार्गदर्शन तर कृषी विभाग असेल कृषी पणन महामंडळ असेल अशा विविध यंत्रणामार्फत तुम्हाला बाजारपेठ आणि आर्थिक सहकार्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आज जवळपास २५ प्रकारचे विविध प्रॉडक्ट आमच्या मार्फत तयार केले जातात. आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सुरुवातीला काही किलो मध्ये विक्री होत असलेले प्रॉडक्ट्स आज अधिकच्या मागणीमुळे पुरवठा करणे अवघड जात आहे. महाराष्ट्रात सर्वदूर आमच्या प्रॉडक्ट्स ला मागणी आहे. हे सर्व पदार्थ हे सर्व प्रॉडक्ट हे कुठलेही रसायने न वापरता तयार केले जातात त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे.

यावेळी डॉ.संजूला भावर यांनी सध्या परिस्थितीतील फळबाग व्यवस्थापनाविषयी माहिती देताना सांगितले की, फळबागांमध्ये सध्या नैसर्गिक आच्छादनांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. फळबागांची लागवड करताना जमिनीचा प्रकार, आरोग्य, पाण्याची व मजुरांची उपलब्धता या सर्व बाबींचा विचार करून पीक निवडावे. कांदा पिकामध्ये खत व्यवस्थापन हे फार महत्त्वाचे असून पहिल्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण खत हे कांद्याला दिले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच आंबा पिकातील सद्य परिस्थिती व्यवस्थापन याबद्दल सविस्तर त्यांनी माहिती दिली. श्री.अशोक निर्वळ यांनी हवामान बदलानुसार पिकामध्ये कोणकोणती कामे केली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हवामान कसे असेल आणि त्या पद्धतीने शेतकरी बांधवांनी प्रत्येक पिकांमध्ये कोणकोणती कामे केली पाहिजेत याबद्दल सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शेतकरी बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी होते.

No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...