शेकटा येथे कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने कापुस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम संपन्न
विशेष कापूस प्रकल्प-२०२४-२५
भा.कृ.अनु.प-केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत दि. ३०-०१-२०२५ रोजी पैठण तालुक्यातील मौजे शेकटा येथे प्रगतशील शेतकरी श्री राजेंद्र भवर यांच्या शेतावर कापूस प्रक्षेत्र दिन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ च्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी शेतीतुन शाश्वत उत्पादन घेण्यासाठी मातीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. तरी प्रत्येक शेतकरी बांधवांनी माती परिक्षण करावे व त्यानुसार पिक लागवडीचे नियोजन करावे. तसेच शाश्वत शेतीसाठी एकात्मिक पिक पद्धतीचा वापर करावा. शेतकरी बांधवांनी सुधारीत कापुस लागवडीचा अवलंब करून जास्तीत जास्त कापसाचे उत्पन्न वाढवावे. तसेच शेतकऱ्यांनी तांत्रिक अडचणी साठी कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथे संपर्क साधावा, असे प्रतिपादन केले.
कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. बी. एल. पिसुरे, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) यांनी प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांना समजावून सांगितला. दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये योग्य योग्य अंतर आणि संतुलित व गरज लागेल तेंव्हाच खतांचा वापर करणे या बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. यामध्ये त्यांनी ३० दिवसांनी गळ फांदी काढणे व ८०-९० दिवसांनी शेंडा खुडणे ही महत्त्वाची कामे आहेत. तसेच कापसाची लागवड ही ९० × ३० सेंटिमीटर या अंतरावर करावी. या पद्धतीने झाडांची एकरी संख्या वाढून उत्पन्न वाढते. तसेच सर्व शेतकऱ्यांनी बेडचा व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे आणि अन्नद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. ज्यामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काचा नियमितपणे वापर करणे, जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा असे सांगितले. कपाशी वेचणीनंतर अनेक शेतकरी फरदड घेतात, ते घेऊ नका त्याऐवजी पऱ्हाटीची कुट्टी करा त्यातुन चांगले सेंद्रीय खतचं मिळते परिणामी जमिनीचा पोत सुधारतो असे डॉ. पिसुरे यांनी सांगितले.
यावेळी शेकटा येथील विशेष कापूस प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकरी श्री. राजेंद्र भवर, श्री. आबासाहेब भवर यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेतले. तसेच या सुधारित लागवड तंत्रज्ञानामुळे त्यांचा या वर्षी ४-५ क्विंटल उत्पादनात वाढ झाली. याबद्दलचे आपले अनुभव शेतकऱ्यांना सांगितले आणि या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. विशेष कापूस प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षक श्री सतिश कदम, श्री जयदेव सिंगल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








No comments:
Post a Comment