राष्ट्रीय सुरक्षेसाठी खाद्य सुरक्षा अत्यंत आवश्यक - मा.डॉ.इन्द्र मणि
विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत शेतकरी मेळावा संपन्न.
भा.कृ.अनु.प. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, भा.कृ.अनु.प. अटारी, पुणे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने शेकटा, ता.पैठण येथे विशेष कापूस प्रकल्पांतर्गत दिनांक ०८ जानेवारी, २०२५ रोजी शेतकरी मेळावा कार्यक्रम घेण्यात आला. या किसान मेळाव्याचं अध्यक्षस्थानी मा. डॉ.इन्द्र मणि, कुलगुरू वनामकृवी परभणी होते.
शेतकरी बांधवांनी वाढीव उत्पादन घेत असताना रासायनिक घटकांचा वापर कमीतकमी करून उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक आहे तसेच एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करावा. कारण खाद्य सुरक्षा ही राष्ट्र सुरक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. तसेच पीक पद्धती मध्ये देखील बदल करण्याची गरज आहे. परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या तुरीच्या बिडीएन ७११ आणि गोदावरी या वाणांचा शेतकरी बांधवाना खूप मोठ्या प्रमाणावर अवलंब करून उत्पादनात वाढ करत आहे. तसेच प्रगतशील शेतकऱ्यांनी अवलंब केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार इतर शेतकरी बांधवा मध्ये करण्यास कार्य करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे मा.कुलगुरू डॉ.इन्द्र मणि यांनी या प्रसंगी केले.
भा.कृ.अनु.प. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, भा.कृ.अनु.प. अटारी, पुणे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने शेकटा, ता.पैठण येथे विशेष कापूस प्रकल्पांतर्गत दिनांक ०८ जानेवारी, २०२५ रोजी शेतकरी मेळावा कार्यक्रम घेण्यात आला. याच्या अध्यक्षस्थानी डॉ.इन्द्र मणि उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.गिरीधारी वाघमारे, संचालक, विस्तार शिक्षण वनामकृवि, परभणी, मा.डॉ.एस.बी.पवार सहयोगी संचालक संशोधन, एनएआरपी, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.ए.एस. तायडे, मुख्य शास्त्रज्ञ, डॉ.व्ही.एस. नगरारे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ.सुनील महाजन, वरिष्ठ शास्त्रज्ञ केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर, शेकटा गावचे सरपंच श्री.विष्णू पाटील भवर यांची उपस्थिती होती. तसेच डॉ. दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१, प्रगतीशील शेतकरी श्री.रवींद्र भवर, श्री.आबासाहेब भवर, विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, श्री.अशोक निर्वळ, श्री.सतीश कदम, श्री.जयदेव सिंगल, श्री.जयदीप बनसोडे, श्री.शिवा काजळे व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.वाघमारे म्हणाले की, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यत पोचवण्यासाठी विद्यापीठ कटीबद्ध आहे. वातावरण बदलामुळे शेतीमध्ये विविध आव्हाने येत असून शेतकऱ्यांनी अभ्यासुपणाने शेती करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध संसाधनाचा वापर करुन अधिक उत्पादन घेण्यावर भर द्यावा. यासाठी विशेष कापूस प्रकल्पा सारख्या प्रकल्पांचा लाभ घेऊन सुधारीत लागवड पद्धतीचा अवलंब करावा. कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातुन विद्यापीठ सदैव तंत्रज्ञान प्रसारात कार्य करत आहे.
यावेळी डॉ. नगरारे म्हणाले की, विशेष कापूस प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांचे महाराष्ट्रात उत्पादन वाढत आहे असे सांगितले तसेच कापूस पिकामध्ये दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान, सघन लागवड व अतिघन लावगड याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हातील या प्रकल्पांतर्गत कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहे. तसेच येत्या काळात कापूस पिकाचे उत्पादन कसे वाढविता येईल. यासाठी कार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.तायडे म्हणाले की, कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी उत्पादन खर्च देखील कमी करण्याची गरज आहे. आणि यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य, कीड रोग आणि लागवड पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. कापूस पिकामध्ये फवारणी व खतांवर अमाप खर्च करत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्याची गरज आहे आणि यासाठी एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये योग्य वाणाची निवड, बेडवर लागवड, योग्य अंतर आणि संतुलित व गरज लागेल तेंव्हाच खतांचा वापर करणे या बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. गळ फांदी काढणे व शेंडा खुडणे ही महत्त्वाची कामे आहेत. तसेच कापसाची लागवड ही ९० × ३० सेंटिमीटर या अंतरावर करावी. या पद्धतीने झाडांची एकरी संख्या वाढून उत्पन्न वाढते. तसेच सर्व शेतकऱ्यांनी बेडचा व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. आणि अन्नद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. ज्यामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काचा नियमितपणे वापर करणे, जैविक बुरशीनाशकांचा वापर करणे इत्यादी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.
डॉ.दिप्ती पाटगावकर, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी विशेष कापूस प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील २१० एकर क्षेत्रावर हा प्रकल्प राबवला जात असून एकूण ९५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत असलेल्या सुधारीत लागवड पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे कापूस उत्पादन वाढल्याचे आढळून आलेले आहे. कापुस पिकामध्ये कापूस लागवड च्या विविध लागवड तंत्रज्ञान चा अवलंब व त्याचा शेतकऱ्यांचा अनुभव यासाठी सदर प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबवण्यात येत असून बरेच शेतकरी या तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. याच्या तांत्रीक बाबींवर सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी केव्हीके द्वारे जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रगतशील शेतकरी श्री. रवींद्र भवर, श्री. आबासाहेब भवर, श्री. यज्ञेश कातबने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शेतकऱ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पिसुरे तर आभार प्रदर्शन डॉ. अनिता जिंतूरकर यांनी केले.





No comments:
Post a Comment