Friday, January 2, 2026

नैसर्गिक शेतीसाठी देशी पशुपालन हि काळाची गरज - मा.डॉ. इन्द्र मणि


नैसर्गिक शेतीसाठी देशी पशुपालन हि काळाची गरज - मा.डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक ०२.०१.२०२६ रोजी ७९ वा शेतकरी शास्त्रज्ञ ऑनलाईन सुसंवाद उपक्रम घेण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू मा. डॉ.इन्द्र मणि, संचालक विस्तार शिक्षण मा.डॉ.राकेश अहिरे, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे येथील प्रमुख शास्त्रज्ञ मा.डॉ. सोमनाथ माने, केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, प्रगतशील पशुपालक शेतकरी मा.श्री.समाधान पाटील, केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.संजूला भावर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी होते.

यावेळी मा.डॉ. इन्द्र मणि म्हणाले कि, नैसर्गिक शेतीचा आधार हा देशी पशुपालन आहे. त्यामुळे प्रत्येक कृषी संस्था, विभाग यांनी याविषयी माहिती आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. प्रत्येक कृषि विज्ञान केंद्रात एक एकरचे नैसर्गिक शेतीचे मॉडेल उभा करण्याचे काम करण्यात येत आहे. कृषि विद्यापीठा द्वारे देखील नियमितपणे यावर कार्य करण्यात येत असून भविष्याची ओळख लक्षात घेऊन हे शेतकऱ्यांना फार फायदेशीर ठरणार आहे. जैविक निविष्ठांचा वापर शेतीमध्ये वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना याबद्दल शास्त्रीय माहिती देणे गरजेचे असून यासाठी विद्यापीठ मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहे. यासाठी कृषि विद्यापीठातील व इतर सर्वच संशोधन आणि विस्तार विभागांनी सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना मा.डॉ.सोमनाथ माने म्हणाले कि, आज आपल्याकडे एकूण ५५ गायींच्या जाती असून त्यापैकी फार कमी या फक्त दुध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांचे योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने नियोजन असेल तर यापासून खूप चांगल्या प्रमाणात दुध उत्पादन घेणे शक्य आहे. पर्यावरणाचे संरक्षण, दुधाचा चांगला दर्जा, आरोग्यवर्धक परिणाम आणि नैसर्गिक शेतीचा आधार या शाश्वत गोपालनाच्या बाबी आहे. देशी पशुपालन करत असताना शेतकरी बांधवांनी संतुलित खाद्य सोबतच मिनरल मिक्स्चर चा पशुधनाच्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे . तसेच पशुधनापासून मिळणाऱ्या दुध, गोमुत्र, शेण यांच्या प्रक्रिया किंवा मूल्यवर्धन याकडे देखील लक्ष देणे अत्यंत आवश्यक असून याद्वारे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत.  यावेळी त्यांनी नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक वेगवेगळ्या जैविक निविष्ठा निर्मिती, देशी गोवंश व त्यांचे आरोग्य, खाद्य व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. जमीन व पर्यावरण संवर्धन, अंशमुक्त आरोग्यदायी दुध, हवामान बदल प्रतिकार क्षमता, नैसर्गिक सेंद्रिय शेती, गोमुत्र मूल्यवर्धन, आरोग्यदायी दुग्धजन्य पदार्थ, कमी मिथेन उत्सर्जन आणि तणावमुक्त जीवन या सर्व बाबी या देशी गायींची गॅरंटी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्या मार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षण व उपक्रमांची माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा फायदा घेण्याचे आव्हान केले.  

यावेळी घोसला ता.सोयगाव येथी प्रगतशील पशुपालक शेतकरी मा.श्री.समाधान पाटील यांनी देशी गोवंश पशुपालन, नैसर्गिक शेतीचा फायदा, विविध जैविक निविष्ठा यांची निर्मिती व वापर, मूल्यवर्धन याविषयीची आपले अनुभव, यशोगाथा यांची माहिती शेतकरी बांधवांना दिली.

यावेळी शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद चर्चा या विभागात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अनिता जिंतूरकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केले.







****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

KVK, Chhatrapati Sambhajinagar Facebook Account


No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...