हुमणीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा- डॉ.दिगांबर पटाईत
११३ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्या द्वारे दिनांक ०१ ऑगस्ट,२०२५ रोजी ११३ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित केला होता.
या कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर च्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख मा.डॉ.दिप्ती पाटगावकर या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून वनामकृवि परभणी चे कृषी कीटकशास्त्रज्ञ मा.डॉ.दिगांबर पटाईत यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागाचे निवृत्त विभागीय कृषि सहसंचालक मा.डॉ.तुकाराम मोटे यांच्यासह केव्हीके येथील विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ.अनिता जिंतुरकर, डॉ.संजूला भावर यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना डॉ.पाटगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि त्या म्हणाल्या कि, कृषि विज्ञान केंद्रात वेळोवेळी विविध विस्तार कार्यक्रमांचे आयोजन शेतकऱ्यांसाठी करण्यात येते. तसेच शेतकरी उपयुक्त विविध निविष्ठा केव्हीकेला उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांचा शेतकरी बांधवांनी उपयोग करून घ्यावा. तसेच कीड आणि रोग व्यवस्थापन साठी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
या कार्यक्रमात हुमणी अळीचे एकात्मिक नियंत्रण याविषयी बोलताना डॉ. पटाईत म्हणाले कि, हुमणी हि अत्यंत घातक कीड असून त्याचे वेळेवरच एकात्मिक व सामुदायिक नियंत्रण करणे गरजेचे आहे. या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने एका रेषेत असतो. एक अळी प्रति चौरस मीटर किंवा एका झाडावर सरासरी २० किवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे असणे हि या अळीची आर्थिक नुकसान पातळी असते. अशावेळी एकात्मिक व्यवस्थापन उपाय योजावेत. बाभूळ, कडुनिंब, बोर इ. झाडांवरील भुंगेरे रात्री ७ ते ९ वाजता काठीच्या साहाय्याने फांद्या हलवून खाली पडून जमा करावेत व रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. भुंगे गोळा करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिक रित्या प्रति एकरी एक प्रमाणे प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. जैविक नियंत्रणमध्ये परोपजीवी बुरशी मेटारायझियम ऑनिसोपिली या उपयुक्त बुरशीचा १० किलो प्रति हेकटर प्रमाणात जमिनीत वापर करावा. तसेच हुमणीच्या अळीला रोगग्रस्त करणाऱ्या सूत्रकृमीचा वापर करावा. मेटारायझियम ऑनिसोपिलीचा वापर हा फार प्रभावी उपाय दिसून आलेला आहे. याच्या नियंत्रणासाठी तज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. हुमणीच्या व्यवस्थापणासाठी त्याचा जीवनक्रम जाणून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, शंखी गोगलगाय च्या व्यवस्थापनासाठी देखील एकात्मिक आणि सामुदायिक उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये शंखी गोगल गाय हाताने गोळा करून नष्ट करणे सर्वात प्रभावी आहे. यासोबत २ टक्के मिठाची फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणामध्ये मेटाल्डीहाईड २ किलो प्रति एकर याप्रमानामध्ये याचा वापर करावा.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बस्वराज पिसुरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.संजूला भावर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी केव्हीकेच्या सर्च अधिकारी, कर्मचारी यांनी नियोजन केले.
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :












No comments:
Post a Comment