केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय कृषी परिषद-खरीप मोहीम २०२५ यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली.
केंद्रीय कृषीमंत्री श्री.शिवराज सिंह यांनी २९ मे पासून राष्ट्रव्यापी 'विकसित कृषी संकल्प अभियान' सुरू करण्याची घोषणा केली.
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे - श्री.शिवराज सिंह
भारत सरकार द्वारे आतंकवादाच्या विनाशाचे महाभियान चालवले जात आहे - श्री.शिवराज सिंह
"ऑपरेशन सिंदूर" हा एक संदेश आहे की देशाच्या दिशेने कोणालाही डोळे वर करून पाहण्यास परवानगी दिली जाणार नाही - केंद्रीय मंत्री श्री.चौहान
सिंधू नदीच्या पाण्यावर आपल्या शेतकऱ्यांचा हक्क, एक-एक थेंबाचा उपयोग शेती, वीज आणि विकासात करू- श्री.शिवराज सिंह
आपल्या कृषी आणि शेतकऱ्यांमध्ये अद्भुत क्षमता आणि अनंत शक्यता आहेत- श्री.शिवराज सिंह
नवी दिल्ली, ०८ मे, २०२५, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात दिनांक ०८ मे,२०२५ रोजी दिल्ली येथील पुसा कॅम्पस मधील भारतरत्न सी. सुब्रह्मण्यम सभागृहात कृषी खरीप अभियान-२०२५ यावर राष्ट्रीय संमेलन यशस्वीरीत्या संपन्न झाले. या संमेलनात विविध राज्यांच्या दहा पेक्षा जास्त कृषी मंत्री सहभागी झाले होते व इतर राज्यांचे कृषी मंत्री यात आभासी माध्यमातून सहभागी झाले आणि कृषीच्या उन्नतीच्या दिशेनं केंद्रासोबत एकत्र काम करण्यावर सहमती दर्शविली.
केंद्रीय कृषी मंत्री श्री.शिवराज सिंह चौहान यांनी राज्यांमधून आलेल्या कृषी मंत्री व अधिकाऱ्यांचे स्वागत करताना सांगितले की, भारतातील १४५ कोटी जनतेसाठी पुरेशी अन्नधान्य, फळे व भाज्या उपलब्ध करण्याची मोठी महत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. हे एक असाधारण कार्य आहे, जे आपल्याला एकत्रितपणे पूर्ण करावे लागेल. श्री चौहान यांनी सांगितले की, भारत फक्त भारतासाठी नाही, तर संपूर्ण जग आमचा परिवार आहे, सर्वांचे कल्याण आपल्याला हवे आहे, आपण कोणाला त्रास देत नाही, पण हे स्पष्ट आहे की जर कोणी आपल्याला त्रास दिला तर त्याला सोडणार नाही. प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आपला संकल्प आहे की आतंकवादाचा मुळातून नाश करूनच शांत होऊ.
श्री.शिवराज सिंह म्हणाले की, भारत एक अद्भुत देश आहे. एकत्र अनेक मोर्च्यावर काम सुरू आहे. कल्याणकारी योजना साठी देखील कार्य सुरू आहे, आज खरीप परिषद चालू आहे. काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक झाली. भारत जागतिक अर्थव्यवस्थेत ५ व्या स्थावरून झेप घेऊन चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना नष्ट करण्याचा महाभियान देखील सुरू आहे. ज्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले होते, अशा दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या सरगनांच्या अड्ड्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्री श्री.शिवराज सिंह म्हणाले की, आमच्या कृषी विभागातील सर्व सहकारी कटिबद्ध आहेत. आम्ही पंतप्रधानजींच्या पाठिशी उभे आहोत. आम्हाला आमच्या सेनेवर, सेनेच्या शौर्यावर, आमच्या जवानांवर आणि ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सर्व साथीदारांवर गर्व आहे. "ऑपरेशन सिंदूर" हा संदेश आहे की भारताकडे कोणालाही नजर उठवू देणार नाही. कोणतीही किंमत द्यावी लागली तरी रक्ताच्या अंतिम थेंबापर्यंत देशाच्या मान, सन्मान आणि शान सोबत कोणालाही खेळू देणार नाही.
श्री शिवराज सिंह यांनी सांगितले की, १९६० मध्ये झालेला सिंधू पाणी करार हा एक ऐतिहासिक चूक होती. देश आणि शेतकऱ्यांचे दुर्दैव होते की आपल्या देशातून वाहणाऱ्या नद्यांचे ८० टक्के पाणी पाकिस्तानला देण्यात आले होते. म्हणून पहलगामच्या दहशतवादी घटनेनंतर सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला आहे. यांनी सांगितले की, सिंधू नदीच्या पाण्यावर आपल्या शेतकऱ्यांचा हक्क आहे. प्रत्येक थेंबाचा वापर शेती, वीज आणि विकासासाठी केला जाईल. तसेच यामुळे पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू-कश्मीर, लडाख, आणि हिमाचल प्रदेशच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी मिळू शकेल.
श्री.चौहान म्हणाले की, आज आपण शेतकऱ्यांच्या मेहनतीने धान्याचे भंडार भरले आहेत. उत्पादन सतत वाढत आहे. मी माझ्या वैज्ञानिकांना शुभेच्छा देईन. अलीकडेच आपण तांदळाच्या दोन वाणांची निर्मिती केली आहे. ज्यामुळे उत्पादन वाढेल, इतर वाणांच्यातुलनेत २० दिवस अगोदर पिक तयार होईल. पाण्याची बचत होईल, मीथेन गॅसचे उत्सर्जन कमी होईल. लवकरच ही वाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येतील. २०१४ च्या नंतर २९०० नवीन वाणांची निर्मिती आमच्या वैज्ञानिकांनी केली आहे.
श्री.चौहान यांनी सांगितले की, ही खरीफ परिषद कोणतीही औपचारिकता नाही. यापुढे रब्बी परिषद दोन दिवसांसाठी घेतली जाईल. आमचे काम उत्पादन वाढवणे, उत्पादनासाठी लागणारा खर्च कमी करणे, उत्पादनाची योग्य किंमत देणे, आपत्तीमध्ये सहाय्य करणे, फळे आणि फुलांची लागवड वाढवणे आहे. श्री.चौहान यांनी सांगितले की, ही जमीन फक्त आपल्यासाठी नाही, तर या जमिनीला येणाऱ्या पिढ्यांसाठीही आरोग्यदायी ठेवणे आवश्यक आहे. अमाप खते वापरल्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. मी कृषी मंत्री आहे म्हटल्यास मला २४ तास हेच विचारात घ्यावे लागेल की शेतकऱ्यांचे कल्याण कसे होईल. मेहनतीने काम केले पाहिजे आणि कृषीसाठी उपलब्ध संसाधनांचा योग्य उपयोग करत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान आणि संशोधनाला प्रयोगशाळेतून शेतावर पोहोचवणे आवश्यक आहे. या संदर्भात श्री.चौहान यांनी 'विकसित भारत संकल्प अभियान' अंतर्गत शास्त्रज्ञांचा चमू तयार करण्याची आणि त्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आराखडा मांडला आणि हे चमू कशा प्रकारे गावागावात जाऊन शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी काम करणार आहेत याबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आमच्याजवळ १६ हजार शास्त्रज्ञ आहेत, ज्यामध्ये ४-४ शास्त्रज्ञांची टीम तयार केली जाईल. याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतावर जागरूकतेचे अभियान राबवले जाईल. या चमूंचा उपयोग शेतकऱ्यांच्या सेवेसाठी केला जाईल. हि मोहीम वर्षातून दोन वेळा राबवली जाईल. रब्बी हंगामासाठी ऑक्टोबरमध्ये अभियान सुरू होईल. श्री.चौहान यांनी राज्याच्या कृषी मंत्र्यांना या अभियानात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आवाहन करताना सांगितले की, जोपर्यंत आपण सर्वजण एकत्र येऊन एक दिशेने चालणार नाही, तोपर्यंत शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी हवे असलेले परिणाम मिळणार नाहीत.
या परिषदेत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री.रामनाथ ठाकूर यांचीही उपस्थिती होती. यासोबतच विविध राज्यांमधून आलेले मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव, कृषी सचिव, कृषी आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी शास्त्रज्ञ यांचीही यावेळी उपस्थिती होती. मुख्य कृषी सचिव श्री.देवेश चतुर्वेदी यांनी या परिषदेची प्रस्तावना केली आणि सर्व राज्यांसोबत योग्य समन्वय राखून काम करणार असल्याचे सांगितले. सचिव (खते) श्री.रजत कुमार मिश्रा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. भा.कृ.अनु.प चे महासंचालक डॉ.एम.एल.जाट हे मार्गदर्शन करताना म्हणाले कि, भारतीय कृषी हळूहळू हवामानानुसार अनुकूल होत आहे, जी एक मोठी उपलब्धी आहे. कमी हेक्टरात अधिक उत्पादन घेण्याबाबत कार्य पद्धतशीरपणे सुरू आहे. आयसीएआरचे डीडीजी (कृषी विस्तार) डॉ. राजबीर सिंह यांनी विकसित कृषी संकल्प मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिली. डीडीजी (पीक शास्त्र) डॉ. डी. के. यादव यांनीही यावेळी संबोधित केले. हवामान विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ श्री.राहुल सक्सेना यांनी हवामानाबाबत माहिती दिली. संयुक्त सचिव श्री.अजित कुमार साहू, श्री.पूर्णचंद्र किशन आणि श्री.सैमुअल प्रवीण कुमार यांनीही यावेळी सादरीकरण केले. कृषी मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुश्री.पेरिन देवी यांनी आभार व्यक्त केले.
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :




No comments:
Post a Comment