जमिनीचे शोषण नको, पोषण करा - डॉ.दिप्ती पाटगावकर
मोढा बु. ता.सिल्लोड येथे खरीप पूर्ण हंगाम नियोजन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर आणि एटलास क्रॉपको इंडिया प्रा.लि. आणि सावित्रीबाई फुले समाज एकात्म मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०८ एप्रिल, २०२६ रोजी भूमी सुपोषण अभियान अंतर्गत सिल्लोड तालुक्यातील मोढा बु. येथे खरीप पूर्व हंगाम नियोजन मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी केव्हीके, छत्रपती संभाजीनगर च्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, श्री.सतीश कदम तसेच साफु च्या प्रकल्प अधिकारी श्रीमती.ज्योती शेजुळ, श्री.सागर शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.दिप्ती पाटगावकर म्हणाल्या कि, शाश्वत उत्पादन घेण्यासाठी जमिनीचे आरोग्य जपणे सर्वात महत्वाचे आहे. जमिनीचे शोषण थांबवून तिचे पोषण करणे आवश्यक आहे. तसेच अतिरिक्त रसायनांच्या वापरामुळे जमीन विषारी बनत चालली असून हे थांबवण्यासाठी विविध जैविक निविष्ठांचा वापर करून जमिनीचे सुपोषण करणे आवश्यक आहे. जमिनीचे सुदृढ असेल तरच आपणाला पाहिजे तसे आणि शाश्वत उत्पादन घेणे शक्य होणार आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी विविध जैविक निविष्ठांचा वापर आपल्या शेतीमध्ये वाढवणे आवश्यक आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.संजूला भावर यांनी पाण्याच्या उपलब्धते नुसार शेतकऱ्यांनी थोड्या क्षेत्रावर तरी फळबाग लागवडीकडे वळणे आवश्यक आहे. माती परीक्षण अहवाल नुसार फळबाग लागवड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. फेब्रुवारी नंतर पाण्याची उपलब्धता कमी असेल तरी त्यानुसार कमी पाण्याची गरज असणाऱ्या फळपिकांची लागवड करणे शक्य आहे. तसेच यावेळी त्यांनी सांगितले की भाजीपाला पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा.
डॉ.बस्वराज पिसुरे यांनी खरीप पिकातील बीजप्रक्रिया, बियाणे उगवणक्षमता तपासणी तसेच जैविक निविष्ठांचा नियमित वापर याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. तसेच कापूस पिकामध्ये घन लागवड तंत्रज्ञान, दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. तसेच सर्वच पिकांमध्ये एकात्मिक कोड व रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती.ज्योती शेजुळ यांनी केले. यावेळी गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment