निरोगी मातीसाठी माती, हवा, पाणी आणि सुक्षजीव यांचे संतुलन राखणे आवश्यक -
मा.डॉ.प्रकाश देशमुख
सांजखेडा येथे जागतिक मृदा दिवस उत्साहात साजरा
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी आणि कृषी विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी सांजखेडा ता.छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक मृदा दिन-२०२५ कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त कृषि विज्ञान केंद्रात राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून गावच्या सरपंच श्रीमती.कस्तुरताई भोपळावत यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील फळबाग संशोधन केंद्राचे माजी प्रमुख मा.डॉ.एम.बी.पाटील, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा.श्री.प्रकाश देशमुख, कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ च्या कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी मा.श्रीमती.तेजस्विनी साळुंके यांची उपस्थिती होती. तसेच कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ चे विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, कार्यक्रम सहायक श्री.विवेक पतंगे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी श्री.संदीप शिंदे, श्री.शिवानंद आडे व इतर अधिकारी कर्मचारी, शेतकरी बंधू भगिनी यांची उपस्थिती होती.
यावेळी मा.डॉ.एम.बी. पाटील यांनी सद्य परिस्थितीतील मोसंबी पिकाचे व्यवस्थापन तसेच मोसंबी बहार व्यवस्थापन आणि मोसंबी पिकातील संतुलित अन्नद्रव्य पाणी व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, योग्य नियोजन व संतुलित आणि शिफारशीत तंत्रज्ञानाचा अवलंब मोसंबी मध्ये केल्यास मोसंबी हे पीक अधिक उत्पादन देते त्यामुळे शेतकऱ्यांनी मोसंबी पिकांचे योग्य व्यवस्थापन करावे.
यावेळी मार्गदर्शन करताना मा.श्री.प्रकाश देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वच जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण झपाट्याने कमी होताना दिसत आहे. मृदा निरोगी ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढवण्यावर सर्वात जास्त भर देणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी रसायने, रासायनिक खते यासोबतच पाण्याचा देखील संतुलित वापर होणे आवश्यक आहे. अतिरिक्त पाणी दिल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खराब होताना दिसत आहेत त्यामुळे पाण्याची उपलब्धता जास्त प्रमाणात जरी असेल तरी पिकाला आवश्यक आहे तेवढेच आणि संतुलित पाण्याचा वापर शेतकरी बांधवांनी करणे अत्यंत आवश्यक आहे. माती, हवा, पाणी आणि सूक्ष्मजीव या चार घटकांचे संतुलन ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे माती सुपीक आणि उत्पादनक्षम राहण्यास मदत होते. यासोबतच पीक पद्धतीमध्ये बदल, बहुपिक पद्धतीचा अवलंब आणि संतुलित यांत्रिकीकरणाचा वापर या गोष्टीकडे देखील लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. मृदा ही उत्पादनक्षम राहण्यासाठी चांगला बेवड असणाऱ्या पिकांची लागवड करणे आवश्यक आहे आणि असे जर आपण केले तरच आपण येणाऱ्या पिढीला ही जिवंत माती देऊ शकू. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी मृदा आरोग्य वाढवण्यासंदर्भातील विविध पद्धतींचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.
यावेळी मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी मृदा आरोग्य पत्रिकेचे वाचन करून ते समजून घेणे हे फार आवश्यक असल्याचे सांगितले. शेतकरी बांधवांनी आपली मृदा आरोग्य पत्रिका ही व्यवस्थितरित्या समजून त्या पद्धतीने पीक व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. मृदा आरोग्य सोबतच मानवाच्या आरोग्याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. मानवाचे आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल शहरे, ग्रामीण भाग सुदृढ ठेवायचा असेल तर मृदा सुदृढ ठेवणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यामुळे शेतकरी बांधवांनी जमीन सुधारणा संदर्भातील तंत्रज्ञानाचा अवलंब आपल्या शेतीमध्ये करणे आवश्यक आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमांमध्ये डॉ.बस्वराज पिसुरे यांनी मृदा आरोग्य जपण्यासाठी विविध जैविक निविष्ठांचा संतुलित वापर तसेच विविध पिकांच्या अवशेषांचा आपल्या जमिनीतील सेंद्रिय घटक वाढवण्यात असलेला फायदा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच डॉ.संजूला भावर यांनी यावेळी डाळिंब, आंबा व इतर फळपीक व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री.विवेक पतंगे यांनी सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य यांचे जमिनीतील महत्व याबद्दल सविस्तर माहिती दिली. यासोबतच पाणी चाचणी करणे हे देखील आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मुख्य अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य, पीएच, क्षारता, सेंद्रिय कर्ब या सर्व बाबींविषयी शेतकरी बांधवांना सविस्तर मार्गदर्शन केले व मृदा आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक शिफारशींच्या माहितीसाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांच्याशी शेतकरी बांधवांनी वेळोवेळी संपर्क करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी मा.श्रीमती.तेजस्विनी साळुंके यांनी कृषी विभाग, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृदा चाचणी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध असणाऱ्या विविध सुविधांविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी मातीचा नमुना तपासणी, सर्वसाधारण नमुना आणि विशेष मातीचा नमुना तपासणी याबद्दल तसेच तसेच पाणी नमुना तपासणी यांचे महत्व आणि योग्य पद्धती याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शिवानंद आडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केव्हीकेचे कर्मचारी, श्री.जयदेव सिंगल तसेच कृषी विभागाचे विविध कर्मचारी यांनी नियोजन केले.
****
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :
No comments:
Post a Comment