ग्रामीण युवकांनी
कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे-मा.श्री.प्रकाश
देशमुख
केव्हीके येथे पीएम
किसान सन्मान निधी २१ वा हप्ता वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि
शेतकरी
मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर आणि शासकीय कृषी महाविद्यालय, लिहाखेडी ता.सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पीएम किसान सन्मान निधी २१ वा हप्ता वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक
मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा.श्री. प्रकाश देशमुख, एनएआरपी छत्रपती
संभाजीनगरचे सहयोगी संचालक संशोधन तथा कृषी महाविद्यालय, लिहाखेडी चे सहयोगी
अधिष्ठाता व प्राचार्य मा.डॉ.सूर्यकांत पवार व कृषी उपसंचालक मा.श्री.दीपक गवळी, कृषी उद्योजिका मा.श्रीमती.छायाताई साबदे यांची
उपस्थिती होती. तसेच यावेळी केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.संजूला
भावर, डॉ. बस्वराज पिसुरे यांच्यासह सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
सन्माननीय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांनी दिनांक १९
नोव्हेंबर,२०२५ रोजी 'दक्षिण भारत
नैसर्गिक शेती परिषद' चे उद्घाटन केले आणि पीएम किसान सन्मान
निधीचा २१ वा हप्ता थेट ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण कार्यक्रमही यावेळी
झाला. यावेळी माननीय पंतप्रधानांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद
साधला, कृषी उत्पादने पाहिली, प्रदर्शनीमध्ये शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाचे दर्शन
घेतले आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी देशाला संबोधित करताना मा.श्री.नरेंद्र मोदी म्हणाले ली, आपल्या
मातीतली सुपीकता आणि पिकांची पौष्टिकता टिकवण्यासाठी नैसर्गिक शेतीचा मार्ग
स्वीकारणे हेच भविष्यासाठी योग्य आणि आवश्यक आहे. यावेळी ९ कोटी शेतकऱ्यांच्या
खात्यात थेट ₹१८,००० कोटी निधी पीएम
किसान योजनेद्वारे जमा केला गेला. शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारपेठा उपलब्ध
व्हाव्यात, ग्रामीण उद्योजकांना आणि जैविक उत्पादनकर्त्यांना
प्रदर्शन व विक्रीची संधी मिळावी यासाठी नवे प्रयत्न सुरू करण्याची गरज त्यांनी
व्यक्त केली. तसेच यावेळी त्यांनी शेती आणि जैविक उत्पादन क्षेत्रात महिला आणि
तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी विशेष सत्रांचे आयोजन आणि आर्थिक मदतीची हमी देण्यात
आली.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मा.डॉ.दिप्ती पाटगावकर म्हणाल्या कि, पीएम किसान सम्मान निधी मार्फत मिळणाऱ्या निधीचा शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांसाठी उपयोग करावा. यावेळी त्या म्हणाल्या कि, केव्हीके मार्फत शेतकरी बांधवांसाठी वेळोवेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ शेतकरी बांधवांनी नक्की घ्यावा.
यावेळी मार्गदर्शन करताना मा.श्री. प्रकाश देशमुख
म्हणाले की, शेतकरी, महिला शेतकरी आणि विशेष करून ग्रामीण युवकांनी शेती सोबतच
शेतीपूरक प्रक्रिया उद्योगाकडे वळावे.यासाठी शासना मार्फत मोठ्या प्रमाणावर पाठबळ
दिले जाते. यापैकीच एक असेलली पीएमएफएमई ही योजना फार उपयुक्त अशी योजना असून
ग्रामीण भागातील युवकांनी तसेच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कृषी पूरक उद्योग
उभारणीकडे वळणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थींना ३५ टक्के पर्यंतची
सबसिडी देण्यात येते. ज्यामुळे चांगल्या पद्धतीमध्ये कृषी प्रक्रिया उद्योग उभारणी
करू शकतात. तसेच या योजनेअंतर्गत प्रकल्प निवड, प्रकल्प प्रस्ताव बनवणे, सर्व
तांत्रिक माहिती यासोबतच सर्व दस्तावेज निर्मिती आणि प्रकल्प अहवाल सादर करणे इत्यादी
सर्व कामे ही जिल्हास्तरावर नेमून दिलेले संसाधन व्यक्तिमार्फत केली जातात.
त्यामुळे शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प प्रस्ताव सादर करणे सोपे
झालेले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी बांधवांनी विविध कृषी
पूरक उद्योगाचा उभारणी करावी. देशामध्ये या योजने अंतर्गत विविध प्रक्रिया उद्योग
उभारणीमध्ये देशात छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आणि
यापुढेही तो अग्रेसर राहावा याकरिता शेतकऱ्यांनी पुढे येऊन उद्योग उभारणीकडे
वळावे.
यावेळी मार्गदर्शन करताना मा.श्री. दीपक गवळी म्हणाले की,
महाराष्ट्र शासनामार्फत महाविस्तार नावाचे मोबाईल ॲप हे शेतकरी बांधवांसाठी विकसित
करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठ, पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आलेले असून यावर शेतकरी शेती
संदर्भातील सर्व माहिती आपल्या मोबाईलवर मिळू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी
बांधवांनी आपल्या मोबाईल मध्ये हे ॲप डाऊनलोड करावे. या ॲप मध्ये सर्व प्रमुख पिकांची
लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन व इतर माहिती देण्यात आलेली आहे. तसेच एआय तंत्रज्ञानाद्वारे
आपल्या मोबाईलवर आपल्या पिकामध्ये आलेल्या अडचणी थेट विचारून त्याची उत्तर आपण
मिळू शकतो. यावेळी उपस्थित सर्व शेतकरी विद्यार्थी व महिला बंधू-भगिनींनी हे ॲप आपल्या
मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेतले तसेच हे ॲप कसे वापरावे याचे प्रात्यक्षिक देखील
यावेळी घेण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी, महिला शेतकरी तसेच कृषी महाविद्यालय, लिहाखेडी येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हे डॉ.अनिता जिंतूरकर यांनी केले. या सोबतच त्यांनी महिलांना पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग अंतर्गत असणाऱ्या विविध शेतीपूरक उद्योगाबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यकमाच्या यशस्वितेसाठी श्री.सतीश कदम, श्री.जयदेव सिंगल, श्री.जयदीप बनसोडे, श्री.विशाल दाभाडे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.
****
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
KVK Chhatrapati Sambhajinagar Youtube Channel
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :


















No comments:
Post a Comment