मातीचेच खतात रूपांतर करण्यासाठी करा जैविक घटकांचा वापर
मा.डॉ.हरिहर कौसडीकर
११० वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान
केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर
द्वारे ११० वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे दिनांक ०१ मे,२०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या
अध्यक्ष म्हणून केव्हीके, छत्रपती संभाजीनगर च्या कार्यक्रम
समन्वयक मा.डॉ.दिप्ती पाटगावकर या होत्या. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे उप-संचालक संशोधन
मा.डॉ.हरिहर कौसडीकर आणि महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त
प्रगतशील शेतकरी मा.श्री.यज्ञेश कातबने यांनी मार्गदर्शन केले. तसेच विषय विशेषज्ञ
डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर,
डॉ.अनिता जिंतूरकर यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय मार्गदर्शनात
मा.डॉ.दिप्ती पाटगावकर म्हणाल्या कि, मातीचे आरोग्य सुधारण्याकडे सर्व शेतकरी
बांधवांनी लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबतचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केव्हीके
द्वारे नियमितपणे आयोजित केले जातात. माती आणि पाणी परीक्षण यांची प्रयोगशाळा
देखील केव्हीके येथे उपलब्ध असून शेतकरी बांधवांनी माती परीक्षण करून घेऊन
त्यानुसार येणाऱ्या हंगामाचे नियोजन करावे. शाश्वत शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या जैविक
निविष्ठा केव्हीके येथे उपलब्ध असून याचा शेतकरी बांधवांनी वापर करावा तसेच
याबाबतच्या कुठल्याही माहितीसाठी केव्हीके ला संपर्क करावा.
यावेळी मृदा
शास्त्रज्ञ मा.डॉ. कौसडीकर यांचेकडून जैविक घटकांच्या वापरातून जमीन आरोग्य
व्यवस्थापन यावर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. तांत्रिक मार्गदर्शनात मृद शास्त्रज्ञ व उप संशोधन संचालक डॉ.हरिहर कौसडीकर
यांनी नमूद केले की, जमिनीमध्ये
४५% खनिज पदार्थ असून जमिनीस वापसा स्थिती येण्यासाठी २५% हवा आणि २५% पाण्याची
गरज असते. तसेच यासाठी जमिनीमध्ये ५ % सेंद्रिय पदार्थांची आवश्यकता असते. मातीत
सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर यामध्ये गोमूत्र, शेणखत, विविध कंपोस्ट खते , वर्मी
कंपोस्ट यांचा नियमित वापर करावा, खत तयार करताना नीट
कुजवलेले सेंद्रिय खत वापरणे महत्त्वाचे आहे. याबरोबरच हिरवळीची खते स्वतंत्र
किंवा आंतरपिक यामध्ये धेंचा, देशी मूग, तूर यासारखी पिके शेतात पेरून नंतर जमिनीत मिसळल्यास सेंद्रिय कर्ब वाढतो.
विविध द्विदल पीकांची फेरपालट, शेतामध्ये शेळ्या मेंढ्या
बसविणे, भूसुधारक वापरणे, पिकांचे अवशेष
जाळण्याऐवजी कुजवून जमिनीत मिसळणे, तेलबियापेंड, घरगुती व शेतीतील जैविक कचऱ्याचा योग्य वापर करून कंपोस्ट तयार करावे. मातीचे आरोग्य राखण्यासाठी जैविक घटकांचा जसे की जिवामृत, घनामृत, जिवाणू रायझोबियम, पीएसबी, अझॅटोवॅक्टर, ट्रायकोडर्माचा
वापर आदी उपाय उपयुक्त ठरतात. विशेषतः रसायनांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे
वळल्यास जमिनीचा पोत आणि सेंद्रिय कर्ब दोन्ही वाढते, असे
त्यांनी नमूद केले.
यावेळी मार्गदर्शन करताना मा.श्री.यज्ञेश
कातबने म्हणाले कि, शाश्वत व अधिक
उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी अभ्यासपूर्ण शेती करणे आवश्यक आहे. यासाठी
सेंद्रिय निविष्ठांचा प्रभावी वापर करावा. तसेच पशुधनाचे संगोपन, मुग, उडीद व इतर हिरवळीची पिके घेऊन जमिनीत गाढणे तसेच बहुपीक पद्धतीं या
बाबींचा अवलंब केल्यास शेतीमध्ये शाश्वत व दर्जेदार उत्पादन घेता येते. शेतीमध्ये
अभ्यासपूर्ण आणि नियमितपणे काम करत राहिल्यास सर्व पुरस्कार आपोआप मिळतात. तसेच
कृषि विद्यापीठ, कृषि विभाग यांच्या विविध उपक्रमात आपण
सक्रीय सहभागी झाले पाहिजे ज्यामुळे शास्त्रीय व शाश्वत माहिती आपणास मिळते व
त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये करता येतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय
विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे यांनी तर प्रास्ताविक आणि आभार कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख
डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी मानले. कार्यक्रमात मराठवाड्यातील ७० हून अधिक शेतकऱ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवून
शास्त्रज्ञांना प्रश्न विचारले तसेच डॉ. कौसडीकर यांनी शेतकऱ्यांना समाधानकारक
उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar





No comments:
Post a Comment